Ramdas Kadam vs Anil Parab: रामदास कदमांच्या आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 14:11 IST2021-12-18T14:11:02+5:302021-12-18T14:11:37+5:30
शिवसेनेत नाराज असलेले नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Ramdas Kadam vs Anil Parab: रामदास कदमांच्या आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई-
शिवसेनेत नाराज असलेले नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अनिल परबच खरे गद्दार असून शिवसेनेला गहाण ठेवण्याचं काम परब यांच्याकडून सुरू असल्याचा घणाघाती आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला. रामदास कदम यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्या घणाघाती टीका करत अनेक आरोप केले. रामदास कदमांच्या आरोपांबाबत अनिल परब यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी सावध पवित्रा घेत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
"मला रामदास कदमांच्या आरोपांवर काहीही बोलायचं नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि पक्ष त्यावर बोलेल. मी काहीही बोलू इच्छित नाही", असं म्हणत अनिल परब यांनी बोलणं टाळलं आहे.
रामदास कदम यांनी आज अनिल परब यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांचा गद्दार असा उल्लेख केला. तसंच अनिल परब यांच्या विरोधात बोललं की पक्षाच्या विरोधात बोललं अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं म्हटलं. शिवसेनेचं पक्षप्रमुख नेमकं कोण आहेत? उद्धव ठाकरे की अनिल परब? कारण अनिल परबच पक्षप्रमुख असल्यासारखं वागत आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पण २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टशिवाय ते जिल्ह्यात फिरकत नाहीत. शिवसेनेची सत्ता असलेला मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचा गद्दारपणा अनिल परब करत असल्याचीही टीका रामदास कदम यांनी केली आहे. रामदास कदम यांच्या घणाघाती आरोपांवर अनिल परब काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. पण अनिल परब यांनी सावध पवित्रा घेत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेची दखल 'मातोश्री'वर घेतली जाणार का? याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे. रामदास कदम यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.