लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असणाऱ्या सावली डान्सबारवरील धाडीनंतर उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात आरोप केले होते. परब यांनी मंगळवारी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेत या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे त्यांना सादर केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे पुरावे तपासून कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आपण केली आहे. मुख्यमंत्री यांनी एकतर कारवाई करावी अन्यथा हे पुरावे खोटे आहेत, असे स्पष्ट करावे. पुरावे खरे असूनही जर त्यांनी कारवाई केली नाही तर मुख्यमंत्र्यांचेही डान्सबारना अभय आहे असे आम्ही समजू असे परब माध्यमांशी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी हे पुरावे तपासून घेतो व त्यानंतर निर्णय घेतो असे सांगितल्याचे परब म्हणाले.
माझी बाजू मांडेन : कदम
विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून परबांनी आपल्यावर आरोप केले. ते राज्यपालांकडे गेले होते, कदाचित ते राष्ट्रपतींकडेही जातील. पण या खोट्या आरोपांनी माझे लक्ष विचलित होणार नाही. राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जी खाती आहेत त्याच्या कामावर माझे लक्ष आहे. मी माझी बाजू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडेन, असे योगेश कदम यांनी सांगितले.