Join us

अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 07:15 IST

ईडीच्या कारवाईने संशयाचे धुके झाले दाट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ‘ईडी’ने छापेमारी केली असतानाच या प्रकरणावरून उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष पेटला आहे. 

पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे पडत असतानाच शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्याशी त्यांचे कनेक्शन असल्याचा दावा उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. अनिलकुमार पवार हे भुसेंचे नातेवाईक आहेत. पवार यांना नियमबाह्य पद्धतीने आयुक्तपदी बसवले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नियुक्तीसाठी भुसे यांनी आग्रह केला होता. भुसे यांचे शिफारसपत्र सुद्धा आहे,’ असा दावा राऊत यांनी केला आहे.

नियुक्ती ठाकरे यांच्या काळातच : भुसे

‘ईडी ही स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. न्यायव्यवस्था योग्य कारवाई करेलच,’ असे मंत्री भुसे यांनी सांगितले. अनिलकुमार माझे दूरचे नातेवाईक आहेत. मी एकनाथ शिंदेंकडे शिफारस करून त्यांची पोस्टिंग करायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, मी माहिती घेतली की, पवार यांची नियुक्ती एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेंच्या काळात झाली आहे. मी जर अनिलकुमार यांची शिफारस केली असेल तर ते सिद्ध करावे. नातेवाईक आहेत हे मी मान्यच करतो,’ असेही भुसे म्हणाले.

२२ तास पवार कुटुंबीयांची ‘ईडी’कडून चौकशी

वसई-विरार महापालिका आयुक्तपदावरून सोमवारी निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी अनिलकुमार पवारांच्या वसई, नाशिक, सटाणा आणि पुणे येथील १२ ठिकाणी ईडीने छापेमारी केली. तब्बल २२ तास पवार व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू होती. वसई पश्चिमेच्या ज्या शासकीय निवासस्थानी पवार राहत होते त्या ठिकाणी सुरुवातीला ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी एक तास दरवाजा न उघडून रोखून धरले. अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला.  बुधवारी पहाटे पर्यंत कारवाई सुरू होती.

 

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयवसई विरार