Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुख तुरुंगातच; तूर्त घरचे जेवण नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 06:52 IST

बेड व औषधे मिळणार; १४ दिवस कोठडी

ठळक मुद्देघेतल्याने काही समस्या उद्भवली तर त्यांनी घरच्या जेवणासाठी तातडीने अर्ज करावा, असे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे देशमुख यांना काही काळ कारागृहातील अन्नच खावे लागणार आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक  गैरव्यवहारांच्या प्रकरणी पीएमएलए न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख यांना बेड व औषधे पुरविण्याचे निर्देश दिले. देशमुख यांनी घरचे जेवण मिळावे यासाठीही अर्ज केला होता. मात्र, या अर्जावरील सुनावणी काही दिवसांनंतर होणार आहे. तोपर्यंत  राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना कारागृहातील जेवण घ्यावे लागणार आहे.  

देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयाला विनंती केली की, देशमुख यांचे वय व त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता ते कारागृहात जमिनीवर झोपू शकत नाहीत. त्यांना बेड व औषधे देण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्यायालयाने देशमुख यांना बेड व कारागृहातील डॉक्टरांना दाखवून औषधे नेण्याची परवानगी दिली. मात्र, घरचे जेवण देण्यासंदर्भात केलेल्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित ठेवली.  देशमुख यांना कारागृहातील जेवण घेतल्याने काही समस्या उद्भवली तर त्यांनी घरच्या जेवणासाठी तातडीने अर्ज करावा, असे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे देशमुख यांना काही काळ कारागृहातील अन्नच खावे लागणार आहे. अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर रोजी १३ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. अखेरीस सोमवारी त्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा व पोलीस दलातील नियुक्त्या व बदल्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :अनिल देशमुखतुरुंग