हत्या, खंडणीतील आरोपींच्या दाव्यावरून EDची कारवाई,Anil Deshmukh यांची High Courtला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 13:02 IST2021-10-14T13:02:10+5:302021-10-14T13:02:39+5:30
Anil Deshmukh News: हत्या व खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या लोकांनी केलेल्या दाव्याचा आधारावर ईडीने आपल्यावर मनी लाँड्रिंग अंतर्गत कारवाई केली, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात बुधवारी केला.

हत्या, खंडणीतील आरोपींच्या दाव्यावरून EDची कारवाई,Anil Deshmukh यांची High Courtला माहिती
मुंबई : हत्या व खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या लोकांनी केलेल्या दाव्याचा आधारावर ईडीने आपल्यावर मनी लाँड्रिंग अंतर्गत कारवाई केली, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात बुधवारी केला.
चौकशीसाठी मी गुरुवारी ईडीसमोर हजर राहण्यास तयार आहे. मात्र, मी तपासला सहकार्य करत नाही, असेच ईडी सतत बोलत आहे, असे देशमुख यांनी त्यांचे वकील विक्रम चौधरी यांच्याद्वारे न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाला सांगितले. अनिल देशमुख ज्या लोकांचा उल्लेख ‘खंडणीखोर आणि हत्येकरी’ म्हणून करत आहेत, त्यांना त्यांनी याचिकेत प्रतिवादी करावे, असा युक्तिवाद ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमन लेखी यांनी न्यायालयात केला.
देशमुख यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा करत ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी ईडीने देशमुखांना बजावलेले समन्स रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, लेखी यांनी ईडीने कुहेतूने किंवा कायद्याचे उल्लंघन करत तपास केल्याचे नाकारले. देशमुख कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. ते ईडीसमोर उपस्थित राहण्यास बांधील आहेत आणि समन्स उत्तर देणे भाग आहे, असे लेखी यांनी म्हटले.ईडीने बजावलेले समन्स व त्यांनी केलेली सर्व कारवाई रद्द करण्यासाठी देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बुधवारी या याचिकेवरील सुनावणीत हा युक्तिवाद करण्यात आला.
देशमुख यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यापासूनही सवलत मागितली आहे. तसेच ईडी व सीबीआयला आपल्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे अंतरिम निर्देश द्यावेत, अशीही मागणी देशमुख यांनी याचिकेत केली आहे. बुधवारच्या सुनावणीत दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालयाने देशमुख यांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला.