Join us  

'प्रभू राम हे देशवासीयांचे श्रद्धास्थान'; अखेर आव्हाडांच्या विधानावर देशमुखांनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 6:32 PM

जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती.

मुंबई: प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असं विधान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावरुन राज्यासह देशात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी मौन बाळगलं होतं. आता अनिल देशमुख यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे तमाम देशवासीयांचे श्रद्धास्थान आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेलं वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते, पक्षाचे नाही, असं अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. 

...तर मी खेद व्यक्त करतो- जितेंद्र आव्हाड

प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडअनिल देशमुखराष्ट्रवादी काँग्रेस