बापाने ओलांडली क्रौर्याची परिसीमा ओलांडली; ३ महिन्याच्या चिमुरडीला क्षुल्लक कारणावरुन जमिनीवर आपटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:00 IST2025-02-17T15:00:20+5:302025-02-17T15:00:20+5:30
कुर्ला येथे एका क्रूर पित्याने तीन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर उचलून आपटल्याचा प्रकार समोर आला आहे.

बापाने ओलांडली क्रौर्याची परिसीमा ओलांडली; ३ महिन्याच्या चिमुरडीला क्षुल्लक कारणावरुन जमिनीवर आपटलं
Kurla Crime: कुर्ल्यात घरगुती वादातून एका चिमुकलीचा जीव गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. क्षुल्लक कारणावरुन एकाने आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटून तिची हत्या केली. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून खुनाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. ३४ वर्षीय आरोपी पित्याने तीन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर फेकून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
परवेज सिद्दीकी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. परवेज सिद्दीकी हा एलआयजी कॉलनी, विनोबा भावे नगर, कुर्ला येथे राहणारा आहे. परवेझ सिद्दीकी हा त्याची पत्नी सबा, पाच वर्षे, अडीच वर्षे आणि तीन महिने वर्षाच्या तीन मुली, आईवडील, तीन भाऊ आणि त्यांच्या पत्नींसह राहत होता. सिद्दिकी बेरोजगार असल्यामुळे या दाम्पत्यात अनेकदा भांडणे होत होती.
शनिवारी दुपारी दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर हा प्रकार घडला. रागाच्या भरात सिद्दीकीने नवजात मुलगी आफिया हिला पत्नीच्या मांडीवरुन हिसकावून घेतलं आणि जमिनीवर फेकून दिले. यामध्ये आफियाचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा परवेज सिद्दिकीचे आई-वडील हॉलमध्ये होते. तर त्याची पत्नी सबा बेडरूममध्ये मोठ्या मुलीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होती. मुलीने जेवायला नकार दिल्याने सबाने तिच्या डोक्यात हलकेच मारले. हे पाहून सिद्दीकी संतापला. त्याने सबाला बाजूला ओढले. रागाच्या भरात आफियाला हिसकावून घेतला आणि तिला आई वडिलांसमोर जमिनीवर फेकले. यानंतर तो घरातून पळून गेला.
त्यानंतर परवेजच्या आईने लगेचच आपल्या लहान मुलाला फोन करून घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी जखमी मुलीला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सबाच्या तक्रारीच्या आधारे, व्हीबी मार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (२) आणि ११५ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आणि रात्री सिद्दिकीला अटक केली.