Andhra Pradesh to build eight metro ; Filed on November 2020 | आंध्र प्रदेशात आठ डब्यांच्या ३१ मेट्रो बांधणार; नोव्हेंबर २०२० पर्यंत होणार दाखल
आंध्र प्रदेशात आठ डब्यांच्या ३१ मेट्रो बांधणार; नोव्हेंबर २०२० पर्यंत होणार दाखल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीच्या कामाला आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथील कारखान्यामध्ये सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (एमएमआरसीएल) देण्यात आली आहे. या मार्गिकेसाठी आठ डब्यांच्या एकूण ३१ मेट्रो बनविण्यात येणार आहेत. यातील पहिली मेट्रो नोव्हेंबर, २०२० पर्यंत मुंबईमध्ये येणार असल्याचेही सांगण्यात आले. मेट्रो-३ या संपूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेला ‘अ‍ॅक्वा लाइन’ असे संबोधले जाणार आहे.

मेट्रो-३ मार्गिकेसाठी बनविण्यात येणाºया मेट्रोच्या डब्यांचे काम एमएमआरसीएलने ‘अ‍ॅलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड’ या कंपनीला दिले आहे. केंद्र शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेप्रमाणे मेट्रो-३ मार्गिकेच्या सर्व गाड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. मेट्रो-३ चे डबे अद्ययावत असतील; तसेच विनाचालक कार्यन्वयनासाठी सक्षम असतील, असे एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.

एमएमआरसीएलने मेट्रो-३ मार्गिकेवर धावणाºया मेट्रोच्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आॅगस्टमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. एमएमआरसीएलने या मेट्रोच्या डब्यांच्या कामाचा व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे.
मुंबईचा समुद्र आणि वाहत्या पाण्याचा ताजेपणा आणि वेगवान प्रवाह यापासून प्रेरणा घेऊन या डब्यांची रंगसंगती ठरविण्यात आली आहे. यामध्ये फिका हिरवा (अ‍ॅक्वा ग्रीन) आणि फिका पिवळा (बेज) या रंगांचा वापर करण्यात येणार आहे़ त्यापैकी हिरवा रंग समुद्राच्या लाटांचा प्रवाहीपणा, ताजेपणा आणि वेग, तसेच पिवळा रंग हा आरामदायी प्रवासाचे प्रतीक आहे, असे एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.

मेट्रो डब्यांची खास वैशिष्ट्ये

1. प्रवाशांसाठी उद्घोषकांचा वापर.
2. सुरक्षित आरामदायी प्रवासासाठी संपूर्णत: वातानुकूलित व आर्द्रता नियंत्रण यंत्रणा.
3. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी व जाहिरातींसाठी एलसीडीचा वापर.
4. मार्गिकेचा डिजिटल नकाशा.
5. अतिशय सुंदर बैठक व्यवस्थेसह उभे राहून प्रवास करणाऱ्यांसाठी खांबांची व्यवस्था.
6. दिव्यांग प्रवाशांच्या सोईसाठी व्हीलचेअर ठेवण्यास स्वतंत्र व्यवस्था.

7. सुखकर प्रवासाच्या अनुभूतीसाठी अद्ययावत एअर सस्पेन्शनचा वापर.
8. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची सुविधा.

9. आगीपासून संरक्षणासाठी प्रत्येक डब्यात अग्निशमन, धूर व अग्निशोधक यंत्रणा.
10. आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी व ट्रेन नियंत्रक यांच्यात संवाद साधण्यासाठी ध्वनी संवाद (व्हॉइस कम्युनिकेशन) यंत्रणा.
 

Web Title: Andhra Pradesh to build eight metro ; Filed on November 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.