Join us  

अंधेरी कामगार रुग्णालय आग प्रकरण : उद्या दिल्लीत होणार महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 9:14 PM

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी खास लोकमतला ही माहिती दिली.

ठळक मुद्देआगी प्रकरणी उद्या बुधवारी दुपारी 2 वाजता दिल्लीत कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)संतोष कुमार गंगवाल यांनी त्यांच्या कार्यालयात महत्वाची बैठक बोलावलीआज सायंकाळी मंत्र्यांसमवेत खासदार कीर्तिकर यांनी या रुग्णालयाला भेट दिलीरुग्णालयाची इमारत आणि कर्मचारी वसाहत ही जीर्ण झाली असून ती नव्याने बांधून त्याचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याची मागणी कीर्तिकर यांनी केली.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - अंधेरी कामगार रुग्णालयाला काल दुपारी लागलेल्या आगी प्रकरणी उद्या बुधवारी दुपारी 2 वाजता दिल्लीत कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)संतोष कुमार गंगवाल यांनी त्यांच्या कार्यालयात महत्वाची बैठक बोलावली आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी खास लोकमतला ही माहिती दिली.

या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू होऊन 154 जण जखमी झाले. आज सायंकाळी मंत्र्यांसमवेत खासदार कीर्तिकर यांनी या रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची आग्रही मागणी त्यांनी मंत्र्यांकड़े केली. खासदार कीर्तिकर यांनी यावेळी येथील तक्रारींचा पाढा मंत्र्यांकडे वाचला.या रुग्णालयामध्ये अनेक तक्रारी असून आपण गेली 4 वर्षे सातत्त्याने केंद्र सरकारच्या संबंधित मंत्री व प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. येथील अग्निशमन यंत्रणा कुचकामी असून पालिकेच्या अग्निशमन खात्याने येथील रुग्णालयामध्ये असलेल्या अग्निशामक यंत्रणेच्या त्रुटींबाबत रुग्णालय प्रशासनाला चेतावणी दिली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. येथील रुग्णालयाची इमारत आणि कर्मचारी वसाहत ही जीर्ण झाली असून ती नव्याने बांधून त्याचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याची मागणी कीर्तिकर यांनी केली.

यावेळी कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)संतोष कुमार गंगवाल म्हणाले की,या आगीची राज्य शासन चौकशी करेल. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत, जखमींना 2 लाख व किरकोळ जखमींना 1 लाख मदत जाहिर केली. मात्र लोकमत ऑनलाईनला मंत्रांनी काल रात्री दिल्लीत झालेल्या बौठकीचा सविस्तर वृत्तांत सर्वप्रथम लोकमतला मिळाल्यानंतर आज पहाटे याबाबत सविस्तर वृत्त कामगार वर्गापासून ते दिल्लीपर्यंत वायरल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान येथील रुग्णालयामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांना घेराव घालून येथील आगीला दिल्लीचे नॅशनल बिल्डिंग कॉन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन( एनबीसीसी) व कंत्राटदार सुप्रीम जबाबदार असल्याचा आरोप करून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :अंधेरी कामगार रुग्णालयाला आगआरोग्यदिल्लीआगमृत्यू