'अंधेरीची निवडणूक बिनविरोध करा', आता आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 22:32 IST2022-10-16T22:31:18+5:302022-10-16T22:32:26+5:30
Andheri East By Election: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता भाजपावर दबाव वाढताना दिसत आहे.

'अंधेरीची निवडणूक बिनविरोध करा', आता आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र!
Andheri East By Election: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता भाजपावर दबाव वाढताना दिसत आहे. राज ठाकरे, शरद पवार यांच्यानंतर आता शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनीही अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना बिनविरोध निवडून देण्याचा पायंडा आहे, महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती असल्याचं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करुन महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. "तुम्ही तुमच्या राजकीय वजनाचा वापर करुन भाजपशी संवाद साधावा आणि ही निवडणूक बिनविरोध कशी होईल हे पाहावं. कारण आपली राजकीय संस्कृती असं सांगते की एखाद्या नेत्याचं निधन झालं की त्याच्या कुटुंबातील सदस्याला बिनविरोध निवडून दिलं जातं. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपावं", असं प्रताप सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.