अंधेरी-विमानतळ मेट्रोचे भुयारीकरण अखेर पूर्ण; मेट्रो ७ अच्या १.६५ किमी अपलाइनचे काम मार्गी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:35 IST2025-07-16T09:35:19+5:302025-07-16T09:35:39+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मेट्रो ७ अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, ती ३.४ किमी लांबीची आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत.

अंधेरी-विमानतळ मेट्रोचे भुयारीकरण अखेर पूर्ण; मेट्रो ७ अच्या १.६५ किमी अपलाइनचे काम मार्गी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील दुसरी भुयारी मेट्रो मार्गिका असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व ७ अ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मेट्रो मार्गिकेवरील १.६५ किमी लांबीच्या अपलाइन बोगद्याचे भुयारीकरण सोमवारी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेने आणखी एक टप्पा पार केला असून, पुढील वर्षात मीरा भाईंदरची थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणी मिळण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मेट्रो ७ अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, ती ३.४ किमी लांबीची आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत. यातील डाऊनलाइन मार्गाचे भुयारीकरण १७ एप्रिलला पूर्ण झाले होते. त्यानंतर पुढील तीन महिन्यात आता दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचेही भुयारीकरण पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएने दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम ४ नोव्हेंबर २०२३ ला सुरू केले होते. मेट्रो ३ मार्गिकेचा बोगद्याच्या बाजूने या मेट्रोचे भुयारीकरण करण्यात आले आहे. तसेच सहार उड्डाणपुलाच्या रॅम्पखालून हा भुयारी मार्ग गेला. त्यामुळे वाहतूक वर्दळ सुरू असलेल्या सहार उड्डाणपुलाखाली भुयारीकरण करणे, हे आव्हानात्मक काम होते. तसेच या बोगद्याच्या मार्गात मोठ्या भूमिगत मलजल वाहिन्या, पाण्याची मोठी मार्गिका होती. त्यातूनही मार्ग काढत पावणेदोन वर्षांत हे भुयारीकरण एमएमआरडीएने पूर्णत्वास नेले.
एमएमआरडीने या मेट्रोच्या भुयारी मार्गात ६ भागांमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रिकास्ट रिंग सेगमेंट्सचा वापर टनेल लाइनर म्हणून केला आहे. तसेच अंतिम बोगद्याचा व्यास ५.६ मीटर आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.