'आनंदाचा शिधा' गायब? गोरगरिबांची दिवाळी झाली कडू; गृहिणींमध्ये उमटतोय नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 14:27 IST2025-10-26T14:22:02+5:302025-10-26T14:27:20+5:30
महागाईच्या झटक्याने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या नाराजीचा सूर

'आनंदाचा शिधा' गायब? गोरगरिबांची दिवाळी झाली कडू; गृहिणींमध्ये उमटतोय नाराजीचा सूर
मुंबई : राज्य सरकारकडून दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राबवला जाणारा 'आनंदाचा शिधा' या वर्षी राबवण्यात आलेला नाही. परिणामी, अनेक कुटुंबांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त धान्य, साखर किंवा तेल यांचा लाभ मिळणार नाही. यामुळे महागाईच्या झटक्याने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे.
दिवाळी संपली, पण सरकारकडून 'आनंदाचा शिधा' दिला नाही ! सणासुदीच्या काळात महागाईने आधीच कंबर तोडली असताना, यंदा आनंदाचा शिधा दिला नसल्याने लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. दरवर्षी दिवाळीपूर्वी राज्य सरकारतर्फे गरजू कुटुंबांना 'आनंदाचा शिधा' म्हणून साखर, रवा, डाळ, तेल, मसाले यांचे पॅकेज दिले जाते. पण यंदा तो उपक्रम अचानक बंद झाला. त्यामुळे हजारो कुटुंबांची दिवाळी अक्षरशः 'फिकी' झाली आहे.
रेशनवर गहू अन् तांदूळ दुकानावर ग्राहकांना आम्ही गहू आणि तांदूळ देतो असे गोरेगाव पूर्वेतील रेशन दुकानदाराने सांगितले. तर मुंबईत गव्हाचा साठा मुबलक असून ग्राहकांना ज्वारी द्यायचा प्रश्नच येत नाही. ग्राहकांना गहू आणि तांदूळाचे वितरण करण्यात आले असल्याचे अन्न व नागरी पुरवठा अधिकारी म्हणाले.
सरकारने यंदा गोरगरिबांना आनंदाचा शिधा दिला नाही आणि त्यांची दिवाळी कडू केली. जनतेचा आनंद हिरावणाऱ्या सरकारने दिवाळीतही आभाळाएवढी त्यांची निराशा केली. सण संपला, शिधा पण दिला नाही. सुनील प्रभू उद्धवसेनेचे नेते, आमदार
यंदा राज्य सरकारने आनंदाचा शिधा बंद केल्याने, आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सणानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपत आरे कॉलनीतील आदिवासी महिलांना रेशन किट (आनंदाचा शिधा) वाटप केले. यावेळी गोरेगाव (पूर्व) येथील खडकपाडा, नवापाडा आणि आरे कॉलनीतील इतर पाड्यांत ११० आदिवासींना शिधा दिला. सुनीता नागरे, संस्थापिका, अभिषेक सामाजिक व शैक्षणिक संस्था, अंधेरी