Join us

मुख्यमंत्र्यांच्या वाढीव लॉकडाऊन निर्णयाचं कौतुक, आनंद महिंद्रांनी वाजवल्या टाळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:04 IST

मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनसंदर्भातील ट्विटला रिट्विट करत, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय.

मुंबई - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरें यांनी फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी, राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याचं सांगितलं. तसेच, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, तेथील वैद्यकीय यंत्रणांची उपलब्धता पाहून त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत किंवा वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यासाठी, जिल्हा पातळीवर आढावा घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विटही करण्यात आलं आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनसंदर्भातील ट्विटला रिट्विट करत, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय. पारदर्शक, कृतीशील आणि दिलासा देणारे विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. त्यांचे हेच दिलासादायक आणि व्यवहार्यपूर्ण विधान ऑक्सिजनची पूर्तता आणि टीपी रेटला धरुन आहे, असे आनंद महिंद्र यांनी म्हटलंय.  बैठकीनंतरही केलं होतं मुख्यमंत्र्यांचं कौतुक

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगपतींसोबत काही दिवसांपूर्वी कोरोनासंदर्भात व्हर्च्युअल बैठक घेतली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा जनतेला आणि उद्योगधंद्यांना फटका बसू नये यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा सांगितला. तसेच, वेगवान लसीकरण याबाबत उद्योगपतींशी चर्चा केली होती. या बैठकीतील अनुभव सांगतानाही आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँलडवरुन या बैठकबाबत माहिती देण्यात आली होती. सीएमओने केलेल्या ट्विटला महिंद्रा यांनी रिट्विट करत उत्तर दिलं होत, आज पुन्हा तसेच ट्विट महिंद्रा यांनी केलंय. 

यापूर्वी उद्धव ठाकरेंनी नाव न घेता केली होती टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray on lockdown) यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनबाबत वक्तव्य करणाऱ्यांचा समाचारही घेतला होता. यात एका उद्योगपतीच्या वक्तव्यालाही उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर दिलं होतं. या उद्योगपतीने लॉकडाऊन करण्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करा असा सल्ला दिला होता. आरोग्य सुविधा वाढवल्याच आहेत आणि त्या वाढवणे सुरुच आहे, पण केवळ आरोग्य सुविधा वाढवून चालणार नाही, तर त्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची गरज आहे. आरोग्य सुविधा हाताळण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासत असते. त्यांचा पुरवठा हे उद्योगपती करणार का? असा टोला देत मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये न करण्याची विनंती केली होती. 

टॅग्स :मुख्यमंत्रीआनंद महिंद्राउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याडॉक्टर