अरे, साहब लोगो को कुछ नहीं आता, उनको पैसे से मतलब...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 06:38 IST2025-05-28T06:36:25+5:302025-05-28T06:38:07+5:30
अधिकाऱ्याला एका लॉगशिटमागे ५०० रुपये अशाप्रकारे महिन्याला अधिकारी एक ते दीड लाख रुपये कमवत असल्याचे समोर

अरे, साहब लोगो को कुछ नहीं आता, उनको पैसे से मतलब...
मुंबई : ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान सुपरवायझर ललितच्या म्हणण्यानुसार, ‘अरे, साहब लोगो को कुछ नहीं आता... उनको बस पैसे से मतलब है’ पालिका अधिकाऱ्यांना हे ॲप कसे चालते? याबाबत माहिती नसते. एस वॉर्डातील १४ ज्युनियर इंजिनिअरचे यूजर आयडी आणि पासवर्ड असलेले मोबाइल ॲप त्याच्याकडेच असून, तोच सर्व ऑपरेट करतो. अधिकाऱ्याला एका लॉगशिटमागे ५०० रुपये अशाप्रकारे महिन्याला अधिकारी एक ते दीड लाख रुपये कमवत असल्याचे त्याच्याशी झालेल्या संवादातून समोर आले.
विक्रोळीतील रहिवासी आणि टेम्पोमालक गणेश घाडगे याच्या मदतीने या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. घाडगे यांच्यामार्फत डी. बी. एंटरप्राइजेसचे सुपरवायझर ललित, विनोद जोशी आणि प्रवीण पुरोहित यांच्यासोबत स्टिंग ऑपरेशन दरम्यान केलेला संवाद...
घाडगे : ॲपसाठी नवीन मोबाइल खरेदी केलेत का?
ललित : हो. हे सगळे साहेबांसाठीचे मोबाइल आहेत. आता सध्या ११८ चे कुलदीप पराडे यांची आयडी सुरू आहे. एस वॉर्डमध्ये १४ ज्युनियर इंजिनिअरचे मोबाइल माझ्याकडे असतात. त्यात तीन महिला अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांचे १४, वजन काट्यावर एक आणि डम्पिंगवर एक, असे एकूण १६ मोबाइल असून, ते मीच ऑपरेट करतो. कंत्राट संपल्यावर मोबाइलही गायब होतात.
घाडगे : मिठी नदीचा घोटाळा उघडकीस येऊनही अधिकारी ऐवढे धाडस कसे करतात? त्यांनी फिल्डवर असणे आवश्यक आहे ना?
ललित : साहेब लोकांना काही येत नाही... त्यांना फक्त पैशांची घेणे देणे आहे. त्यांना आम्हालाच शिकवावे लागते. सगळ्या अधिकाऱ्यांनी यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून दिले आहेत. हे मोबाइल १५ ते १६ हजारांत खरेदी केले.
घाडगे : साहेबांच्या हिशोबाचे कसे असते?
ललित : लॉगशीटवर काम चालते. एका लॉगशिटवर सही करण्यासाठी ५०० रुपये घेतात. महिन्याला एक ते दीड लाखांची कमाई होते. कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत मॅनेज होतात.
घाडगे : लॉगशिटची पूर्ण पुस्तकेच तुझ्याकडे कसे?
प्रवीण पुरोहित : साहेबांचा विश्वास आहे. त्यामुळे आधीच सही-शिक्का मारून माझ्याकडे दिले जाते. सगळीकडे अशाच पद्धतीने सफाई सुरू आहे.
घाडगे : खूप ठिकाणी ‘काला माल’आहे.
विनोद जोशी : लोकेशन पाठव. मी येतो. रात्रीच्या जास्तीच जास्त गाड्या भरा.