Join us

निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचा वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 12:43 IST

मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहे. अशाप्रकारे जर निधीवाटपात दुजाभाव होत आहे, त्याचा प्रत्यय या सरकारने वेळोवेळी दिला असा आरोप आमदार महेश सावंत यांनी केला.

मुंबई - महायुती सरकार आल्यापासून वारंवार विरोधकांकडून सरकारवर निधीवाटपात अन्याय करत असल्याचा आरोप केला जातो. सत्तेतल्या पराभूत आमदारांना पैसे दिले जातात. विरोधी आमदारांना निधी दिला जात नाही असं विरोधक म्हणतात. त्याच आरोपाला आता महायुतीतील माजी आमदाराने पुष्टी दिल्याचं दिसून येते. एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. निवडून आलेल्या आमदाराला २ कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही २० कोटी मिळतात असं विधान सदा सरवणकर यांनी केले आहे.

माजी आमदार सदा सरवणकर म्हणाले की, पराभूत झालो तरीही आपलं जे नेतृत्व देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्याकडून असलेल्या आमदाराला २ कोटी मिळतात परंतु मी आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात. पराभव झाला असला तरी नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. काम न करणारे जाती-पातीवर निवडून येतात असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र सदा सरवणरांच्या या विधानावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.

तर सदा सरवणकर हा मतदारसंघातील व्हिलन अवतार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून ते आज गडगंड श्रीमंत झाले. परंतु जो पैसा यांनी कमावला तोच इथली शिवसेना संपवण्यासाठी वापरतायेत. आम्हाला निधी मिळत नाही हे सत्य आहे. सत्येचा माज कसा असतो, जनतेने झिडकारलेले यांना २० कोटींचा निधी दिला जातो. लोकांनी आम्हाला निवडून दिलंय, पण आम्हाला निधी दिला जात नाही. मात्र लोकांची कामे होणे महत्त्वाची आहेत. सदा सरवणकरांनी आतापर्यंत मिळालेला किती निधी खिशात टाकला याचा हिशोब समोर यायला पाहिजे असं सांगत स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, मागील निवडणुकीत सरवणकरांनी कुकर वाटप केले. हे कुकर वाटप बीएमसीतून जो काही निधी आला होता, त्यात कट मारून विभागात कुकर वाटले. निवडणुकीत पैशांची उधळण केली. त्यांच्या वरिष्ठांकडून निवडणुकीत इतका पैसा दिला गेला की विभागात पैसा पसरला तरी माजी आमदार घसरला. हे वाक्य विभागात चर्चेत आहे. मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहे. अशाप्रकारे जर निधीवाटपात दुजाभाव होत आहे, त्याचा प्रत्यय या सरकारने वेळोवेळी दिला. २० कोटी निधी कुठल्या आधारे दिला जातो. स्थानिक आमदारापेक्षा ४ पट निधी जास्त दिला जातो. हा कुठला न्याय असा प्रश्न उद्धवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी सरकारला विचारला.  

टॅग्स :सदानंद सरवणकरएकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस