Join us  

अमृता फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही कपात; ठाकरे सरकारचा निर्णय

By मुकेश चव्हाण | Published: January 10, 2021 1:33 PM

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे.

मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कपात केल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण रंगू लागलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, राम कदम यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. या यादीमध्ये अन्य भाजपाच्या नेत्यांचा देखील समावेश आहे.  

मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मात्र देवेंद्र फडणवीसांची झेड सुरक्षा व्यवस्था कमी करत वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिवीजा फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था देखील कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अमृता फडणवीसांना दिली जाणारी वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था कमी करत एक्स सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे. तसेच दिवीजालाही दिली जाणारी वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था कमी करत आता एक्स सुरक्षा दिली जाणार आहे. 

सुरक्षेबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सुरक्षा व्यवस्था मिळत होती, त्याठिकाणी आता वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेअमृता फडणवीसमहाराष्ट्र सरकारभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीदेवेंद्र फडणवीस