लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वरळी कॅम्पमधील ‘पोलिसांचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘गणपती बाप्पा’चा पाद्यपूजन सोहळा रविवारी झाला. यावेळी केवळ मनसे नेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली. मात्र त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांना पाहण्याचा योग जुळून आला नाही.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त रविवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे जाऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आदित्य आणि अमित हे दोन ज्युनियर ठाकरेबंधूही सायंकाळी वरळी पोलिस कॅम्पमधील गणपती पाद्यपूजन कार्यक्रमाला एकत्र येणार असल्याची चर्चा होती.
या कार्यक्रमाला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त एम. एन. सिंह तसेच ज्युलिओ रिबेरोदेखील उपस्थित होते. मात्र उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने आदित्य हे रविवारी कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाहीत, असे माध्यमांना सांगण्यात आले होते. तथापि वरळीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले होते, असे उद्धवसेनेकडून सांगण्यात आले.