अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्याशी बंदद्वार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 07:56 IST2023-09-24T07:55:57+5:302023-09-24T07:56:17+5:30

मराठा आरक्षणासह इतर विषयांवर १५ मिनिटे झाले मंथन

Amit Shah's closed door discussion with Chief Minister Shinde, Fadnavis | अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्याशी बंदद्वार चर्चा

अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्याशी बंदद्वार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबई भेटीवर आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी १५ मिनिटे बंदद्वार चर्चा केली. फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी ही चर्चा झाली. 

मराठा आरक्षणासह राज्यातील राजकीय घडामोडींबाबत शाह यांनी शिंदे-फडणवीस यांच्याशी चर्चा केली. आमदार अपात्रता व संभाव्य परिस्थिती या बाबतही गुफ्तगू केल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्ताराची परवानगी शिंदे-फडणवीस यांनी शाह यांच्याकडे मागितली, असेही सूत्रांनी सांगितले.
शाह यांनी सपत्नीक मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी शाह यांचे औक्षण केले. उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, आ. आशिष शेलार यावेळी उपस्थित होते.

फडणवीस यांच्या घरी गणरायाचे दर्शन :

शाह यांनी सपत्नीक उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री  शिंदे, फडणवीस यांच्या आई सरिताताई फडणवीस, पत्नी अमृता, कन्या दिविजा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Amit Shah's closed door discussion with Chief Minister Shinde, Fadnavis