आधीच ब्लॉक, त्यात ओव्हरहेड वायरचा त्रास मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबईकरांचे मेगाहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 09:54 IST2023-12-18T09:53:57+5:302023-12-18T09:54:37+5:30
विविध कामांसाठी रेल्वेकडून रविवारी मध्य आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता.

आधीच ब्लॉक, त्यात ओव्हरहेड वायरचा त्रास मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबईकरांचे मेगाहाल
मुंबई : विविध कामांसाठी रेल्वेकडून रविवारी मध्य आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप-डाउन जलद मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या माहीम ते सांताक्रूझ दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर ब्लॉक असल्याने मुंबईकरांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला. त्यात सकाळी कर्जत ते भिवपुरी स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.
मध्य रेल्वेने ठाणे-कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतल्याने जलद मार्गावरील लोकल सेवा ठाणे , कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
पश्चिम रेल्वेने माहीम ते सांताक्रूझ दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेतला होता. त्यामुळे माहीम ते सांताक्रूझ/अंधेरी स्थानकांदरम्यान सर्व जलद उपनगरीय लोकल सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. या ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले होते.
याशिवाय रविवार वेळापत्रकामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या अगोदरच कमी होती. त्यात भर म्हणजे सकाळी कर्जत ते भिवपुरी स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने लोकल सेवांचा वेळापत्रकांवर मोठा परिणाम पडला होता. त्यामुळे रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे.