Alphonso Mangoes: कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटक, ‘आंध्र’च्या आंब्याची विक्री

By सचिन लुंगसे | Updated: April 14, 2025 14:18 IST2025-04-14T14:16:35+5:302025-04-14T14:18:47+5:30

Konkan Alphonso Mangoes: भरघोस नफा, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट

Alphonso Mangoes: Mangoes from Karnataka, Andhra sold under the name of Konkan Hapus | Alphonso Mangoes: कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटक, ‘आंध्र’च्या आंब्याची विक्री

Alphonso Mangoes: कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटक, ‘आंध्र’च्या आंब्याची विक्री

-सचिन लुंगसे, मुंबई 
शहर आणि उपनगरांत कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या हापूसची सर्रास विक्री होत आहे. हा आंबा दिसायला कोकणातील हापूससारखा असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे केवळ रंगाला आणि आंब्याच्या दिसण्याला भुलू नका. कोकण हापूसचे साधर्म्य असणारे आंबे मुंबईत फेरीवाले विकत असून, ग्राहकांनी याबाबत सजग राहावे, असे आवाहन कोकणातील हापूस विक्रेत्यांनी केले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कोकणातील देवगड, रत्नागिरी येथील हापूस आंबा मुंबईत मोठ्या प्रमाणावर विक्रीस येतो. देवगड हापूस हा रंगाला केशरी, तर खाण्यास चविष्ट असतो. या उलट कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आंब्याला तितकीशी चव नसते. तेथे आंब्याचे भरघोस उत्पादन येत असले तरी, त्याला कोकणातील आंब्याप्रमाणे गुणवत्ता नसते, असे जाणकारांनी सांगितले.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील आंबा तेथील उत्पादक नवी मुंबई, सांगली, सातारा, पुणे, नाशिक येथील बाजारात विक्रीस पाठवतात. 

दलाल मंडळी नफा कमावण्यासाठी त्याचप्रमाणे कोकणातील हापूसची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या आंब्याची कोकणच्या हापूससोबत सरमिसळ करतात. विक्रेते, फेरीवाले यांच्याकडून हा आंबा खरेदी केल्यानंतर ग्राहकाला तो ओळखता येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते.

आंब्याच्या दरांत तफावत 

कोकणातील हापूस आंब्याचा भाव प्रति डझन १,२०० किंवा १,५०० रुपये असेल, तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या आंब्याचा भाव प्रति डझन ८०० रुपये असतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पेटीत सरमिसळ

अनेकदा व्यापारी कोकण आणि कर्नाटक-आंध्र प्रदेशातील आंबा एकाच पेटीत भरतात. परिणामी आंब्यातील फरक ओळखता येत नाही. स्वस्तात पेटी मिळत असल्याने अनेकदा ग्राहक ती खरेदी करतात. मात्र हा आंबा खाल्ल्यानंतर त्याच्या चवीवरून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. कोकणातील अस्सल हापूस मुंबईकरांना मिळावा म्हणून, कोकणातील आंबा उत्पादकांनी ठिकठिकाणी स्टॉल लावले आहेत.

Web Title: Alphonso Mangoes: Mangoes from Karnataka, Andhra sold under the name of Konkan Hapus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.