लोकल-मेट्रोसोबत; रेल्वे स्थानकांचेही सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:57 IST2025-08-06T11:56:57+5:302025-08-06T11:57:47+5:30

सतीश कुमार मुंबई दौऱ्यावर आले असून, त्यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्यालयात बैठक घेतली.

Along with local-metro; survey of railway stations also | लोकल-मेट्रोसोबत; रेल्वे स्थानकांचेही सर्वेक्षण

लोकल-मेट्रोसोबत; रेल्वे स्थानकांचेही सर्वेक्षण


मुंबई : मुंबईलोकलच्या घाटकोपर आणि अंधेरी स्थानकाचे मेट्रोसोबत एकत्रीकरण केले आहे.  मेट्रो आणि लोकल स्थानकावर प्रवाशांची गर्दी  विभाजण्यासाठी या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्षाच्या अखेरीस किमान चार नवीन मेट्रो रेल्वे मार्ग अंशतः सुरू होणार आहेत. त्यामुळे मल्टी मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) अंतर्गत उपनगरीय रेल्वे स्थानकांना मेट्रोसोबत जोडण्यासाठी लोकल स्थानकांचा सर्वे करणार असल्याचे भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

सतीश कुमार मुंबई दौऱ्यावर आले असून, त्यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्यालयात बैठक घेतली. यापूर्वी त्यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी खाररोड, घाटकोपर स्टेशनची पाहणी केली होती. दरम्यान उपनगरीय रेल्वे सोबत मेट्रोच्या स्थानकांवर इंटरचेंज सुविधा असलेल्या अंधेरी आणि घाटकोपर स्टेशनवर सध्या काही प्रमाणात गर्दीची समस्या आहे. अशा समस्या भविष्यात उद्भवू नयेत यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर खार रोड प्रमाणे मोठे डेक उभारण्याचे नियोजन करणार असल्याचे कुमार म्हणाले.

मेट्रोची लोकल स्टेशनसोबत संभाव्य जोडणीसाठी सर्वे करण्यात येणार आहे. या तपासणीमुळे अमृत भारत स्टेशन विकास योजनेंतर्गत इतर स्थानकांवरही अशाच उपाययोजना करण्याची शक्यता समजण्यास मदत होईल, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारच्या बैठकीत या निष्कर्षांवर चर्चा करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. 

एमएमआरडीए प्रशासन एमएमआय अंतर्गत मेट्रोची विविध वाहतूक सुविधांसोबत जोडणी करण्याचे अगोदरच प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, उपनगरीय रेल्वे स्टेशनसोबत जोडणी मिळण्यासाठी काही महिन्यांपूर्वी नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिवांसोबत रेल्वे प्रशासनाची बैठक झाल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरीय स्थानकांवर सुमारे ६.४३ लाख चौरस फूट लांबीचे डेक बांधले जात आहे. त्याची किंमत ९४७ कोटी रुपये आहे. हे डेक उपलब्ध झाल्यावर गर्दीचे व्यवस्थापन करता येऊ शकते. त्यांच्यावर तिकीट काउंटर, शौचालये, फूड स्टॉल आणि व्यावसायिक जागा उपलब्ध होईल. 

रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करून प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या खार रोड स्टेशनवर मोठा डेक उभारला असून, घाटकोपर स्टेशनवर काम सुरू आहे. स्टेशनवरची सध्याची गर्दी, मेट्रोशी इंटरचेंजची उपलब्धता आणि स्टेशनबाहेरील परिस्थिती यांचा विचार करून सर्वे केला जाणार आहे.
सतीश कुमार, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय रेल्वे बोर्ड

Web Title: Along with local-metro; survey of railway stations also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.