The allegation of rape against Minister Dhananjay Munde did not have any effect in the Gram Panchayat elections | आरोपांचा मतदारांवर परिणाम नाही; परळीतील दणदणीत विजयानंतर धनंजय मुंडे म्हणतात...

आरोपांचा मतदारांवर परिणाम नाही; परळीतील दणदणीत विजयानंतर धनंजय मुंडे म्हणतात...

परळी/ मुंबई:  गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. 

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय जीवन धोक्यात आलं होतं. तसेच हे सर्व आरोप ग्रामपंचायत निवडणूकीच्या काही दिवसांआधीच झाल्यानं याचा परिणाम परळीतील ग्रामपंचायतींवर होणार का, याची चर्चा रंगली होती. मात्र सोमावारी लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निकलावरुन धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा मतदारांवर परिणाम जाणवला नाही. 

परळीतील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. त्यामध्ये ६ ग्रामपंचायत पैकी पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या  नेतृत्वाखाली पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. 

धनंजय मुंडे ट्विटरद्वारे म्हणाले की, परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूका झालेल्या 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन, गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 

परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा ,सर्फराजपूर , भोपळा, गडदेवाडी , रेवली येथील ग्रामपंचायतीच्या 42 जागेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले याचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये लाडझरी सर्फराजपुर ,गडदे वाडी, येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल ला यश मिळाले तर  मोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस -भाजप पुरस्कृत पॅनल विजय मिळाला आहे.. रेवली येथे एका जागेसाठी मतदान झाले होते  त्यात अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे. तसेच  वंजारवाडी  ग्रामपंचायत  यापूर्वीच बिनविरोध झाली आहे ,रेवली, वंजारवाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात असल्याचे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

तक्रारदार महिलेने काय केले आरोप?

'२००६ पासून चार-एक वर्ष सोडल्यास धनंजय मुंडेंनी माझा वापर केला. २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मला सांत्वना दाखवून, विश्वास देऊन केवळ माझा वापर करून घेतला. मला उद्ध्वस्त केलं. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला, असे खळबळजनक आरोप तक्रारदार महिलेनं केले, गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प का राहिलात, असा प्रश्न महिलेला विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप महिलेनं केला आहे.

माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे- धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत याबाबत खुलासा करताना म्हटले की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत)  स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही  तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The allegation of rape against Minister Dhananjay Munde did not have any effect in the Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.