Join us  

पहिल्या पावसातच पालिकेचे सर्व दावे वाहून गेले; मुंबईतील परिस्थिती पाहून आशिष शेलार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 1:03 PM

वर्षानुवर्षे पालिकेने कंत्राटदारांची काळजी केली, आता मुंबईकरांची काळजी करावी, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

मुंबई: कालपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले. पहिल्याच पावसात अशी अवस्था झाल्यानं पुढे काय होणार?, असा सवाल मुंबईकर उपस्थित करत आहे. शनिवारी मुंबई आणि उपनगरांतील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. दक्षिण आणि मध्य मुंबईच्या तुलनेत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. कमरेपर्यंत पाणी, गाड्यांना रस्सीने बांधण्याची नामुष्की मुंबईकरांवर आली होती. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

आशिष शेलार म्हणाले की, जेव्हा मुंबईत नालेसफाई सुरू होती, भाजपाने उन्हातान्हात उतरुन  पहाणी करुन नालेसफाईची कामे असमाधानकारक झाल्याचे  निदर्शनास आणून दिले होते. मात्र वर्षानुवर्षांचे तेच कंत्राटदार, तीच पध्दत, तीच अपारदर्शकता, अधिकाऱ्यांची तीच लपवाछपवी, त्यामुळे  कालच्या पहिल्या पावसातच पालिकेचे दावे वाहून गेले, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. तसेच पालिकेने अजूनही कंत्राटदारांची बाजू न घेता, काही उपाययोजना करता आल्या तर करव्यात, असं म्हणत वर्षानुवर्षे पालिकेने कंत्राटदारांची काळजी केली, आता मुंबईकरांची काळजी करावी, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

CM शिंदे उतरले रस्त्यावर; मिलन सबवे अन् कोस्टल रोडची केली पाहणी,अधिकाऱ्यांना दिले निर्देश

मुंबईकरांचे तथाकथित रखवालदार उबाठाचे माजी नगरसेवक, माजी महापौर या काळात गायब होते. आणि उबाठा प्रमुख लंडनमध्ये तेव्हा थंड हवा खात होते, असा निशाणाही आशिष शेलार यांनी साधला. उबाठाने वर्षानुवर्षे पोसलेल्या कंत्राटदारांमुळे यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत जी परिस्थिती उद्भवेल त्यावेळी उबाठा गटाने आपल्या तोंडाची "गटारे" बंदच ठेवावीत. उबाठा आणि उबाठाचे पाळीव कंत्राटदार हा जो एक "परिवार" तयार झालाय, तोच मुंबईकरांचा खरा गुन्हेगार असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान, काल संध्याकाळपर्यंत मुंबई, नवी मुंबईच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मुंबईत मोसमी वारे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे सध्या सुरु असणारा पाऊस हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच गेल्या २४ तासांत नैऋत्य मोसमी वारे सक्रीय झाले असून त्यामुळे दक्षिण कोकण भागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. हवामान विभागाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तर पुढील ५ दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसमुंबई महानगरपालिकाभाजपाआशीष शेलार