All the seats in Mumbai will win alliance, Chief Minister's determination | मुंबईतील सर्व जागा युती जिंकणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार
मुंबईतील सर्व जागा युती जिंकणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबई : गेली विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढलो होतो. मात्र आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही टीम एकत्र आल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व ३६ जागा जिंकून दाखवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
लोढा यांनी शुक्रवारी दुपारी मुंबई भाजप अध्यक्षपदाची सूत्रे मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून स्वीकारली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात जर कोणी अडथळा आणत असेल तर तो दूर करून अशा इमारतींचा तातडीने पुनर्विकास करण्याबाबतचा कायदा आणण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
गेली पंचवीस तीस वर्षे मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या सेस, बिगरसेस इमारतीतील रहिवाशांचे प्रश्न लोढा यांनी तीव्रतेने मांडले. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आज त्याचीच परिणिती म्हणून राज्य सरकारने या रहिवाशांना दिलासा देणारे अनेक निर्णय केले आहेत. येत्या चार-पाच वर्षांत मुंबईतील चाळीत राहणाऱ्या प्रत्येकाला स्वत:च्या मालकीचे घर मिळणार आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुर्घटनांत माणसांचे जीव जाताना पाहून मनाला यातना होतात. आधीच्या काँग्रेस सरकारांनी त्यासाठी कोणतीच धोरणे आखली नाहीत. पण आता अशा इमारतींच्या पुनर्विकासाला बंधनकारक करणारा कायदा आम्ही आणू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लोढा समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी कधीच विसरले नाहीत़ त्यांनी कधी भांडवलही केले नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पक्षासाठी देखील त्यांनी झोकून देऊन काम केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेत ४२ नगरसेवक निवडून आणून दाखविले. भाजपची अत्याधुनिक अशी वॉररूम ते गेली सहा वर्षे अतिशय यशस्वीरित्या सांभाळत आहेत, अशी प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली.
> विधानसभेची मॅच ३६-०
विधानसभेच्या मुंबईतील सर्वच्या सर्व ३६ जागा जिंकण्याचे आपले लक्ष्य आहे. त्यासाठी दिवस कमी उरले आहेत पण कार्यकर्त्यांच्या ताकदीवर हे लक्ष्य आपण पूर्ण करून दाखवू असा विश्वास व्यक्त करून मंगलप्रभात लोढा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व त्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे. फडणवीस यांच्याकडे धर्मराज युधिष्ठिराची नीती आहेच पण श्रीकृष्णाचे चातुर्यही आहे, असे ते म्हणाले. भाजपची सदस्यता मोहीम देखील जोमाने राबविण्यात येणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले. मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांनी गेल्या सहा वर्षांत अतिशय चांगली कामगिरी केली असल्याबद्दल लोढा यांनी त्यांचे आभारही मानले.


Web Title: All the seats in Mumbai will win alliance, Chief Minister's determination
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.