संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 02:16 IST2025-05-13T02:15:44+5:302025-05-13T02:16:39+5:30
तिन्ही संरक्षण दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली.

संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सरकार तिन्ही संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल आणि सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.
तिन्ही संरक्षण दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फडणवीस यांनी बैठक घेतली. राज्यातील सुरक्षा आणि सज्जता यावर चर्चा झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. लष्करातर्फे लेफ्ट. जनरल पवन चढ्ढा, कर्नल संदीप सील, भारतीय नौदलातर्फे रियर ॲडमिरल अनिल जग्गी, नौदल कमांडर नितेश गर्ग, वायुदलातर्फे एअर व्हाइस मार्शल रजत मोहन हे बैठकीला उपस्थित होते. रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एटीएस, होमगार्ड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गुप्तचर माहितीचे आदानप्रदान आदी वर प्रामुख्याने चर्चा या बैठकीत झाली.
समन्वयाने एकत्रित काम करू या
फडणवीस म्हणाले की, भारतीय सैन्याने ज्या ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबविले, ते अभूतपूर्व आहे. मुंबईसारखे शहर हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भारताची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले, तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला, हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल. राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करू या.