आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 08:54 IST2025-11-08T08:54:32+5:302025-11-08T08:54:52+5:30
खडबडून जागे झालेल्या एमएमआरडीएने रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया जलद

आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्पासाठी बोरीवली बाजूकडील जागा रिकामी करण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरुवात केली. या प्रकल्पात ५७२ प्रकल्प बाधित असून त्यापैकी ६ नोव्हेंबरपर्यंत १५७ बांधकामे एमएमआरडीने तोडून घरे रिकामी केली होती. पुढील आठ दिवसात या प्रकल्पासाठी जागा रिकामी केली जाणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे-बोरीवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ११.८५ किलोमीटर लांबीच्या मार्गाची उभारणी एमएमआरडीएकडून केली जात आहे. यात १०.२५ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी १८,८३८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एमएमआरडीएने मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला जून २०२३ मध्ये प्रकल्पाचे काम दिले आहे. प्रकल्पाचे ठाणे बाजूकडील काम सुरू झाले. मात्र प्रकल्पाची बोरीवली बाजूकडील भुयारीकरणापूर्वीची प्राथमिक कामेही सुरू झाली नाहीत. त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनी अद्यापही रिकामी करण्यात आली नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला विलंब झाल्याने राज्य सरकारने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.
आठ दिवसांत जागा रिकामी करणार
खडबडून जागे झालेल्या एमएमआरडीएने रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया जलद केली आहे. या प्रकल्पात ५७२ प्रकल्पबाधित असून त्यातील ३६३ जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित २०९ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन एसआरएमार्फत केले जाणार आहे. एमएमआरडीएने गुरुवारपर्यंत १५७ बांधकामे तोडली होती. तर शुक्रवारीही पाडकाम सुरू होते. उरलेल्या २०६ बांधकामांचे तोडकामही लवकरच करून आठ दिवसांत जागा रिकामी केली जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान अद्यापही एसआरएकडून पुनर्वसन केल्या जाणाऱ्या २०९ बांधकामांचे तोडकाम होणे बाकी आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.