Join us

अक्षयचे पालक आरोपी नाहीत, त्यांचा दोष नाही; बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 06:08 IST

आम्ही कुठेही गेल्यावर आम्हाला लक्ष्य केले जाते. आम्हाला बदलापूर येथील घरात राहता येत नाही. आम्हाला आमच्या घरातून हाकलण्यात आले आहे. आम्ही कल्याणला रेल्वे स्थानकात राहतो. नोकरीही देण्यात येत नाही. त्यामुळे आमच्याकडे पैसे नाहीत, अशी व्यथा पालकांनी न्यायालयात मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याचे पालक आरोपी नाहीत. त्यांचा दोष नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अक्षयच्या पालकांना मदत करण्याची सूचना केली. अक्षय शिंदेच्या पालकांच्या निवारा आणि रोजगाराची व्यवस्था सरकार करू शकते का? अशी विचारणाही न्यायालयाने केली. 

‘पालक आरोपी नाहीत. त्यांचा दोष नाही. त्यांनी त्रास का सहन करावा? मुलाने केलेल्या गुन्ह्यासाठी पालकांना शिक्षा देऊ शकत नाही. पालकांना सरकार आणि नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागू नये,’ असे न्यायालयाने नमूद केले.‘काय करता येईल? सरकारच्या मदतीने कुठेतरी त्यांचे पुनर्वसन होऊ शकत नाही का? काही एनजीओ त्यांना निवारा आणि नोकरी देण्यास मदत करू शकतात का? त्यांना जगण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी सक्षम करणे आवश्यक आहे’, असे म्हणत खंडपीठाने १३ जानेवारी २०२५ रोजी पुढील सुनावणी ठेवली.  

घरात राहू दिले जात नाही, आम्ही रेल्वे स्थानकावर राहतो

न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान अक्षय शिंदेच्या पालकांशी संवाद साधला. ‘आम्ही कुठेही गेल्यावर आम्हाला लक्ष्य केले जाते. आम्हाला बदलापूर येथील घरात राहता येत नाही’, अशी व्यथा पालकांनी न्यायालयात मांडली. ‘आम्हाला आमच्या घरातून हाकलण्यात आले आहे. आम्ही कल्याणला रेल्वे स्थानकात राहतो. नोकरीही देण्यात येत नाही. त्यामुळे आमच्याकडे पैसे नाहीत’, असे मृत आरोपी अक्षयच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले.

 

टॅग्स :बदलापूरमुंबई हायकोर्ट