Join us  

"मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांचं गुडघ्याला बाशिंग, पण नवरी मिळेना"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 12:51 PM

आमदार शहाजी बापू पाटील यांनी साताऱ्यात 'शासन आपल्यादारी' या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

मुंबई/सातारा - शिवसेना शिंदे गटाच्या मिशन गुवाहटीत एका डायलॉगमुळे राज्यभर प्रसिद्ध झालेले आमदार शहाजी बापू पाटील हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केल्याने आणि कौतुक करण्यामुळे नेहमीच चर्चेत असता. गेल्याच आठवड्यात सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांनी तोंडभरुन स्तुती केली होती. मात्र, साताऱ्यातील कार्यक्रमात शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केलीय. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांचा धागा पकडत पाटील यांनी त्यांच्या शैलीत अजित पवारांवर टीका केली. 

आमदार शहाजी बापू पाटील यांनी साताऱ्यात 'शासन आपल्यादारी' या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, शंभुराज देसाई यांसह शिंदे गटाचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी, आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या स्टाईलने तेथील कार्यक्रमाचे, गर्दीचे वर्णन केले. तसेच, यावेळी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हा डायलॉगही म्हणून दाखवला. दरम्यान, आपल्या भाषणावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर टीका केली. 

अजित पवार मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग घेऊन फिरत आहेत. मात्र, त्यांना नवरी काय मिळत नाही, असे म्हणत शहाजी बापूंनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. तर, संजय राऊत सकाळपासून टीव्हीसमोर येऊन टीका करत असतात, असंही त्यांनी म्हटलं.  सध्या 'राजकारण खालच्या थराला गेलं आहे. रोज उठून काहीना काही आरोप ते मातोश्रीतील आणि ३-४ टाळकी करत असतात. एरवी कधीही न घराबाहेर पडलेले उद्धव ठाकरे, आम्ही गुवाहाटीला गेलो की आता तरणेताट झाले. आता सर्व मणके व्यवस्थित झाले', असेही पाटील यांनी म्हटले. 

'दररोज उठून आठ महिने आमच्यावर भूंकत आहे. शिंदेंची नियत साफ आहे. आज कर्नाटकचा निकाल लागला. पण, आनंद मातोश्रीला जास्त झाला. आम्हाला शिव्या देताय. आम्ही तडफदार आहोत. आम्ही दबंग आणि बाजीगर आहोत. आम्हाला आमदारकीच्या काय भीती का घालता? आम्ही पहिल्या रांगेतले आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही, अशा बापू स्टाईलने त्यांनी साताऱ्यात भाषण केलं.  

टॅग्स :अजित पवारमुख्यमंत्रीसाताराराजकारण