मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात मोठं विधान केलं आहे. राजकारणात कोणीही कधी कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो, असं म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला आहे. सध्या तरी विरोधी पक्षात बसणार असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, बारामतीकर आणि आमचं नातं महाराष्ट्रातील जनतेला अजून कळलेलंच नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.एक परिवार म्हणून आम्ही एकमेकांना साथ देत असतो. कितीही लाटा आल्या आणि गेल्या तरीही बारामतीकरांनी कधीही आम्हाला अंतर दिलेलं नाही. मी म्हटलं होतं 1 लाखांच्या मताधिक्क्यानं निवडून येईन, पण बारातमीकरांनी मला त्याहून जास्त मताधिक्क्यांनी निवडून दिलं. सतत त्यांच्या ऋणामध्ये राहावंसं वाटतं. अजित पवारांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकांद्वारे राज्याच्या राजकारणात आपले स्थान पुन्हा बळकट केले आहे. राष्ट्रवादीनं 53 जागा पटकावत चांगलं यश मिळवलं आहे. तर काँग्रेसलाही 44 जागा राखता आल्या आहेत. विधानसभेला भाजपच्या जागा कमी झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे. त्यातच विरोधी पक्षांनी शिवसेनेला ऑफर दिल्याने शिवसेनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार यावं असाही एक मतप्रवाह आहे.
राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान; राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल सस्पेन्स वाढवला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 13:40 IST