अजित पवार-आदित्य ठाकरेंचा वरळीत फेरफटका; विकासकामं पाहून म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 09:31 IST2022-02-12T09:30:40+5:302022-02-12T09:31:22+5:30
आदित्यच्या गाडीत अजित पवार, दोघांनी घातला वरळी दर्शनाचा घाट

अजित पवार-आदित्य ठाकरेंचा वरळीत फेरफटका; विकासकामं पाहून म्हणाले...
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी वरळी विधानसभा मतदारसंघासह मुंबईतील विविध विकासकामांची पाहणी केली. अजित पवार यांच्या या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्या गाडीचे सारथ्य स्वत: पर्यटनमंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.
अजित पवार यांनी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांच्या साथीने महालक्ष्मी रेसकोर्स सायकल ट्रॅक, धोबीघाट, सातरस्ता संत गाडगे महाराज चौक नूतनीकरण, पोलीस कॅम्प ते वरळी सी फेस पादचारी पुलाचे नूतनीकरण, वरळी जेट्टीचे सुशोभिकरण, दादर चैत्यभूमी प्रेक्षक गॅलरी, माहीम रेतीबंदर किनारा सुशोभिकरण आदी कामांची पाहणी केली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, विकासकामे करताना काही लोकांना दुसरीकडे हलवावे लागले. पण, आदित्य ठाकरे यांनी कोणाला वाऱ्यावर सोडले नाही. गाडी चालवणे प्रत्येकाची आवड असते. आम्ही सगळे एकत्र काम करतो. त्यांनी गाडी चालवली म्हणून वेगळा अर्थ काढू नका, असे सांगतानाच फोटो काढून आम्हाला नौटंकी करायची नाही, असे पवार म्हणाले.
...तोपर्यंत मास्क कायम
मंत्रिमंडळाची बैठक झाली की, मास्कमुक्तीच्या बातम्या सुरू होतात. मात्र, जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत मास्क काढून चालणार नाही. मास्क हा लावावा लागणारच आहे. मास्कमुक्तीची घोषणा ही पत्रकार परिषद घेऊन केली जाईल, असेही पवार यावेळी म्हणाले.