Join us  

Kisan Long March: गिरीश महाजनांची नौटंकी; सरकार बेजबाबदारपणे वागतंय- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 10:58 AM

आपण सरकारमध्ये आहोत, मंत्रिमंडळात आहोत, निर्णय घेणं हे आपलं काम आहे, ही गोष्टी त्यांना कळली पाहिजे.

मुंबई: दहावीच्या परीक्षार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांचा अखिल भारतीय किसान लाँग मार्च रविवारी रात्रीच आझाद मैदानात दाखल झाला. एकीकडे शेतकरी इतक्या शहाणपणाने वागत असताना सरकार मात्र बेजबाबदारपणे वागतंय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मुंबईत येऊन धडकलेल्या किसान लाँग मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी मोर्चात सहभागी झालेले मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. मोर्चात सहभागी होणे म्हणजे गिरीश महाजन यांचा नौटंकीपणा होता. आपण सरकारमध्ये आहोत, मंत्रिमंडळात आहोत, निर्णय घेणं हे आपलं काम आहे, ही गोष्टी त्यांना कळली पाहिजे. मात्र, निर्णय घ्यायचा सोडून केवळ शेतकऱ्यांविषयी सहानुभूती वाटते, हे दाखवण्यासाठी महाजन शेतकऱ्यांना भेटले. ठोस निर्णय घेऊन ते मोर्चात सहभागी झाले असते, तर एकवेळ ठीक होते. मात्र, मदतीचे सोंग करून ते शेतकरी मोर्चात दाखल झाले. हा मोर्चा काही एका रात्रीत निघाला नाही. सरकारला एवढेच वाटत होते तर मोर्चाची तारीख जाहीर झाली तेव्हाच त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधायला होता. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आल्यानंतर मुंबईकर आणि राजकीय पक्षांनी सकारात्मक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. सरकारनेही पूर्वीच ही भूमिका घेतली असती तर आज ही वेळ ओढवली नसती, असे अजित पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :किसान सभा लाँग मार्चमहाराष्ट्रअजित पवार