Join us  

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ यांची उडी; गृहमंत्री अनिल देशमुखांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 10:20 AM

Sushant Singh Rajput: अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती, काही जणांनी ही आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली आहे असा आरोप केला जात होता

ठळक मुद्देअभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने अनेक चाहत्यांना धक्का बसला असंख्य युवकांनी मला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलेसुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करावा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी उडी घेतली आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाही कारणीभूत आहे असा आरोप त्याच्या चाहत्यांकडून केला जातो, सुशांतच्या एक्झिटने बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला, अनेकांनी यावरुन खान, कपूर घराण्यावर टीकास्त्र सोडलं. करण जोहर, सलमान खानविरोधात चाहत्यांनी कोर्टात धाव घेतली होती.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती, काही जणांनी ही आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली आहे असा आरोप केला जात होता, सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूड जबाबदार आहे असे चाहते सांगत होते, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे.

पार्थ पवार यांनी लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या युवकांसाठी सुशांत एक आयडॉल होता. अनेक चाहत्यांनी याबाबत मला ईमेल्स, फोन, मेसेज केले, यात बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेशमधील युवकांनी मला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. सुशांतला न्याय मिळवून द्यावा या युवकांच्या भावना योग्य आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच देशातील अनेक युवकांचा आवाज म्हणून मी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची तपास सीबीआयकडे देण्यात यावा. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्यरितीने तपास करत आहेत. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे, पण सुशांतला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणात सीबीआयच्या तपासाची शिफारस करावी अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे. तसेच या प्रकरणाशी जोडलेल्या भावना तुम्ही समजू शकता, सुशांतला न्याय देण्यासाठी तातडीनं प्रयत्न कराल असा विश्वासही पार्थ यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतआत्महत्यामुंबई पोलीसगुन्हा अन्वेषण विभागअनिल देशमुखपार्थ पवार