Join us  

'अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं', आता रुपाली चाकणकरांची भर भाषणात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 2:56 PM

आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचा मुंबईत मेळावा सुरू आहे.

Ajit Pawar ( Marathi News ):मुंबई- आज राष्ट्रवादी काँग्रेसमधीलअजित पवार गटाचा मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनीही ही मागणी केली होती. 

आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा महिला मेळावा होत आहे. यावेळी रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजितदादा तुम्ही जो निर्णय घेतला, त्या निर्णया सोबत आम्ही सर्व महिला आहोत यासाठी हा मेळावा घेतला आहे. आज या मेळाव्यासाठी सर्व समाज घटकातून महिला आल्या आहेत. येणाऱ्या काळात तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवावे ते देण्यासाठी ही महिला शक्ती असावी. राज्याचे नेतृत्व बदलण्याची ताकद या महिला शक्तीत आहे, असंही चाकणकर म्हणाल्या.

बेहिशेबी मालमत्ताः आमदार राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल; पत्नी, मुलाचाही समावेश

"महिला भावनिक असल्या तर त्या निर्णय कुठे घ्यायचा ते विचारपूर्वक घेतात. आता पहिल्यासारख राहिलेले नाही. आपल्यासाठी कोण विचार करत हे त्यांना कळते. आणि म्हणूनच या महिला आज या मेळाव्याला आल्या आहेत. तुम्ही नागपूरच्या कार्यक्रमाला आला होतात. या कार्यक्रमात आम्हाला निधी देणार असल्याचे सांगितले होते, आता राज्यातील महिला अर्ध्या तिकिटात महाराष्ट्रात प्रवास करतात. सध्या राष्ट्रवादीला मान मिळतोय. महिला धोरणाच्या निमित्ताने तुम्ही महिलांना मान दिला आहे, कवच दिले आहे, असं कौतुंकही चाकणकर यांनी अजित पवार यांचे केले. 

या आधीही अनेकवेळा अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा झाली. आता पु्न्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे, यामुळे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

टॅग्स :रुपाली चाकणकरअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस