Join us

“वारीत पायी चालत जाणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, कुठे अन् कधी होणार सहभागी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 16:25 IST

NCP DCM Ajit Pawar In Ashadhi Wari: जयंत पाटील यांनाही घेऊन जायला तयार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

NCP DCM Ajit Pawar In Ashadhi Wari: १७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ झाल्या आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार आणि शिस्तबद्धतीने पालख्या मार्गक्रमण करत आहेत. पंढरपुरातील विठुरायाला भेटण्याची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. राज्यात एकीकडे वारीचा उत्साह असून, दुसरीकडे राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यातच आता आषाढी वारीत पायी सहभागी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना वारीत सहभागी होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच शरद पवार आणि जयंत पाटील यांना खोचक टोलाही लगावला. वारकऱ्यांना दिंडीतून जाताना अनेक अडचणी येत असतात. वारकरी संप्रदाय महामंडळ आणि वारीतील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याची संकल्पना सरकारने मांडली. अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी येथील पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेतले. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारी उत्सवात सहभाग घेतला, असे सांगत आपणही वारीत सहभाग घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

मला काही अद्याप जाता आले नाही, पण...

आषाढी वारीत मला काही अद्याप जाता आले नाही. पण पालखी बारामतीत मुक्कामाला येत आहे. परवा सकाळपासून काटेवाडीपर्यंत वारीत चालत जाणार आहे. आता, सगळ्यांनाच वारीच्या पालखीत चालत जावसे वाटते, मग आपणही सहभागी होऊया, असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावल्याचे सांगितले जात आहे. तसेच जयंतराव येतील की नाही कुणास ठाऊक, पण मी घेऊन जायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, वारीला जागतिक नामांकन मिळाले पाहिजे, त्यामुळे युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे. वारीला येणाऱ्या वारकऱ्यांप्रती एवढे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दाखवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील याच सरकारने केले आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :आषाढी एकादशीची वारी 2022अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसबारामती