Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सिंचन घोटाळा फेम अजित पवार"; फडणवीसांच्या पत्रावर राऊत म्हणाले, अरे बापरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 08:28 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने ते अजित पवार गटासोबत असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबई - देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अधिवेशनात उपस्थित राहिले. त्यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातील आमदारांसोबत बसले. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि नवाब मलिकांबाबत काही सवाल उपस्थित केले. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीसांच्या पत्रानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत आहे. तर, राष्ट्रवादीनेही स्पष्टीकरण दिलं आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने ते अजित पवार गटासोबत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, यावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. फडणवीसांनीही यावर प्रत्युत्तर दिलं. मात्र, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहून नबाव मलिक यांना महायुतीत घेता येणार नसल्याचे म्हटले. फडणवीसांच्या पत्रावर आता पुन्हा एकदा शिवसेनेनं त्यांना इतर नेत्यांच्या घोटाळ्यांची आठवण करुन दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन फडणवीसांच्या पत्रावर अरे बापरे.. अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, पिते दुध डोळे मिटुनी, जात मांजराची.. असेही म्हटले आहे. 

अरे बापरे!

सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ED फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची.., अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. 

राष्ट्रवादीकडूनही भूमिका स्पष्ट

फडणवीसांच्या पत्रानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नवाब मलिक यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही नवाब मलिक यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे, असे तटकरे यांनी म्हटले. 

पत्रातील मजूकर काय?

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, असे फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

टॅग्स :संजय राऊतअजित पवारदेवेंद्र फडणवीसनवाब मलिक