Join us

Ajit Pawar: होऊन जाऊ द्या 'दूध का दूध, पानी का पानी', आमदाराच्या प्रश्नावर अजित पवार उत्तरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 16:59 IST

दरम्यान यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लवकरच अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना चौकशीच्या अहवालाबाबत अवगत करु, असे सांगितले.

मुंबई - राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेला गैरव्यवहाराचा मुद्दा अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे तो अगोदरही केला होता. त्यामुळे सहकार मंत्र्यांनी अण्णा हजारे यांना जाऊन भेटावे व यंत्रणामार्फत कोणकोणत्या चौकशा सरकारने केल्या याची माहिती देऊन 'दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊ द्या आणि समाजाला वस्तुस्थिती काय आहे हे कळू द्या अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तारांकित प्रश्नाच्या तासाला उत्तर देताना मांडली. 

दरम्यान यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लवकरच अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना चौकशीच्या अहवालाबाबत अवगत करु, असे सांगितले. राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले. 

कारण नसताना गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करायला सांगितली होती. सीआयडीमार्फत ही चौकशी झाल्यानंतर त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले. एसीबीनेही यासंदर्भात क्लिन चीट दिली. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनीही आर्थिक गुन्हे अन्वेषणमार्फत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. ही चौकशी सुरु असताना सहकार विभागाने माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. न्यायाधीश जाधव यांच्या चौकशीतही काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे सीआयडी, एसीबी, आर्थिक गुन्हे अन्वेषण आणि माजी न्यायाधीशांच्या चौकशीत काहीही निष्पन्न झालेले नाही. यापैकी दोन चौकशा फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तर दोन चौकशा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात झालेल्या आहेत असेही अजित पवार म्हणाले. 

एखादा कारखाना विक्रीला निघाल्यानंतर राज्य सहकारी बँक तो चालवायला देते. ज्यांना कुणाला कारखाने चालवायचे आहेत, त्यांनी त्याठिकाणी जावे आणि परिस्थिती पाहावी. लोक टीका करतात पण कारखाना चालवायला कुणीही पुढे येत नाही. विरोधी पक्षनेते, सभागृहातील सदस्य तसेच देशपातळीवरच्या नेत्यांचा मोठा गैरसमज झालेला आहे, असे सांगत अजित पवार यांनी साखरेचे गणित यावेळी समजावून सांगितले. साखर विकल्यानंतर बँकेचे थकीत पैसे आणि शेतकऱ्यांना ऊसाची रक्कम द्यावी लागते. ही वस्तुस्थिती सांगत राज्यातील काही कर्जबाजारी कारखान्यांची यादी अजित पवार यांनी वाचून दाखवली. तोट्यात कारखाना गेल्यानंतर त्यात भ्रष्टाचार झाल्याचा बाऊ केला जातो. पण त्यात सत्य नाही. हायकोर्टाने काही कारखाने तोट्यात गेल्यामुळे विक्रीला काढले आहेत असेही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :अजित पवारभ्रष्टाचारअण्णा हजारेमुंबईसाखर कारखाने