Join us  

अजित पवार यांचं वय लहान, पुढच्या काळात संधी मिळू शकते; शिंदे गटाचे आमदार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 2:00 PM

अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

मुंबई- अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनीही माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता प्रतिक्रियाही येत आहेत. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया दिली. 

“मलाही वाटते की माझ्या हयातीत मुलाने CM व्हावे”; अजित दादांच्या आईने व्यक्त केली इच्छा

मंत्री दीपक केसरकर म्हणाले, अजित पवार यांच वय लहान आहे. मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा असणे हे काही गैर नाही. पण शेवटी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वात पुढची निवडणूक लढवली जाणार आहे, अजितदादांचे वय लहान आहे त्यांना पुढच्या काळात संधी मिळू शकते, असंही मंत्री दीपक केसरकर म्हणाले. 

“मलाही वाटते की माझ्या हयातीत मुलाने CM व्हावे”

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत असून, मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, अनेक ठिकाणच्या लढतींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मात्र ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यातच बारामतीत महायुतीत एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट आणि भाजप एकमेकांविरोधात मैदानात उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहेत. मतदानाला आलेल्या अजित पवार यांच्या मातोश्रींनी माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली.

पुणे जिल्ह्यामधील बारामतीच्या काटेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश होतो. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मतदान काटेवाडी ग्रामपंचायतमध्ये आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले. यामुळे या ठिकाणची लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. इंदापूर तालुक्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अजित पवारांच्या आईने मुलाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदेदीपक केसरकर