Join us

"काम नाही ते असले वाद घालतात"; अजित पवारांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर, "त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:09 IST

हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरुन अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली

Ajit Pawar on Hindi Language: इयत्ता पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी सक्तीची करण्यात आली आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४नुसार, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात हिंदीची सक्ती कशासाठी असा सवाल मनसेकडून विचारण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत अशा शब्दात आपला रोष व्यक्त केला. त्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

राज्यात पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्यामुळे संजय राऊतांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदी भाषेचा आदर आहे मात्र अभ्यासक्रमात त्याची सक्ती नको असे संजय राऊत यांनी म्हटलं. तर तिन्ही भाषांना महत्त्व आहे पण मातृभाषेला एकनंबरचे स्थान असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ज्यांना काम नाही ते असे वाद घालत असतात अशी बोचरी टीका अजित पवार यांनी राज ठाकरेंचा उल्लेख न करता केली आहे. अजित पवार यांनी हिंदीबाबत केलेल्या विधानावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.

"महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलेच पाहिजे. त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालते. काहीजण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे. त्यावरुन वाद आहे आणि मला त्यात शिरायचे नाही. बाकीच्यांना कुणाला उद्योग नाही, काम नाही ते असले काही वाद घालतात. त्याच्यातच ते वेळ घालवतात. इंग्रजी ही जगात बहुतेक देशांमध्ये चालते. त्यामुळे ती भाषासुद्धा आली पाहिजे. तिन्ही भाषांना महत्त्व आहे. पण शेवटी आपल्या स्वतःच्या मातृभाषेला एक नंबरचे स्थान आहे," असे अजित पवार म्हणाले. 

दुसरीकड, राष्ट्रभाषा हिंदी आहे असं अजित पवार यांना वाटत असेल तर त्यांनी पहिलीपासून धडे घेतले पाहिजेत. त्यांना शाळेत परत पाठवलं पाहिजे, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. 

टॅग्स :अजित पवारराज ठाकरेहिंदीमनसे