Join us

कोट्यवधींची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश; अजित पवार म्हणाले, "भ्रष्टाचारी असतो तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 14:38 IST

दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने दिलेल्या निर्णयावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला. दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरण न्यायालयाने ऑक्टोबर २०२१ मध्ये प्राप्तिकर विभागाच्या ताब्यातून अजित पवारांच्या जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जप्त केलेली मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून परत करण्यात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या होत्या. यावरुचन विरोधकांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यावर प्रत्युत्तर देतान अजित पवार यांनी याला काहीही अर्थ नसल्याचे म्हटलं आहे. तसेच यावेळी विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन आमदाकीची शपथ न घेतल्याने अजित पवार यांनी सुनावलं आहे.

"मी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काम केलेले आहे. या निवडणुकीत ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही. लोकसभेत ईव्हीएमने महाविकास आघाडीला ३१ जागा दिल्या. त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं. इकडं मात्र असा निकाल लागला त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना त्यांनी काय वक्तव्य करायचं हा त्यांचा अधिकार आहे. पण उद्याचा शपथ घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तरच परवा सभागृहामध्ये ते कामकाजात भाग घेऊ शकतात. ही प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय, आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा त्यांचा केविलवाणा प्रकार सुरू आहे. त्याला काही अर्थ नाही," असं अजित पवार म्हणाले.

"सुरुवातीला हे सगळे आत बसले होते. आमच्यापैकी आठ दहा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन खाली उतरताना ते नेमके बाहेर निघाले होते. त्यावेळी काहींना विचारलं की कुठे चालला आहात त्यांनी असचं चाललोय असं सांगितलं. त्यांच्यातल्या काही लोकांना आता विचारलं तर ते म्हणाले की आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही. काही नवीन स्ट्रॅटेजी आहे कोण म्हणतंय ईव्हीएम करता आहे तर कोण दुसरे काही म्हणतय," असंही अजित पवार म्हणाले.

माध्यमांनी यावेळी भाजपसोबत गेल्याने दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना दिलासा दिलाय अशी टीका विरोधकांकडून होत आहे असं म्हटलं. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं.

"याला काहीही अर्थ नाही. इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो. कुठल्याही कोर्टाचा निकाल एका दिवसात लागत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी होते. त्यानंतर तुम्हाला अपील करण्याचा अधिकार असतो. या प्रक्रिया बरेच दिवस त्या ठिकाणी चालल्या होत्या. आम्ही आमची भूमिका मांडली. आता यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला. मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही. मी जर अतिशय दोषी, भ्रष्टाचारी असतो तर बाकीच्यांनी माझ्यासोबत कामच केलं नसतं. मलाही पदे मिळाली नसती. आज राजकीय भूमिकेतून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण माझं मन मला सांगत होतं की आपण जिथे न्याय मागायचा आहे तिथे आपण मागू शकतो आणि मी तो न्याय मागत होतो," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४अजित पवारइन्कम टॅक्समहाविकास आघाडी