Sharad Pawar VS Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करत आहे. महाराष्ट्रभरातून हजारो आंदोलनकर्ते मुंबईत शुक्रवारी दाखल झाले असून त्यांचा सरकारविरोधात रोष वाढताना दिसत आहे. आम्हाला राजकारण नको तर आरक्षण हवे आहे. मात्र, मुख्यमंत्री राजकारण करत असून आरक्षण देण्यास टाळत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीवरुन पवार विरुद्ध पवार सामना पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरुन शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्यावरुन अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्हाला खोलात जायला लावू नका असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगेच्या आंदोनलवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अहिल्यानगरमध्ये बोलताना तामिळनाडूत आरक्षण वाढू शकतं तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल शरद पवार यांनी केला. घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
"हे जे काही सूचना करतात ना हे सगळे जण अनेक काळ सरकारमध्ये होते. १० वर्षे सत्तेत होते. त्यामुळे उगाच आम्हाला खोलात जायला लावू नका. सगळे वंदनीय, पूजनीय आणि आदरणीय आहेत. त्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही," असं अजित पवार म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
"आरक्षणाचे असे प्रश्न सोडवायचे असतील तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले गेले पाहिजेत. यामध्ये केंद्र सरकारने निर्णय घ्यावा लागेल. ७२ टक्के आरक्षण तामिळनाडूत होऊ शकतं, तर मग वेळप्रसंगी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाचा हा तिढा सोडवण्याच्या संबंधी निर्णय संसदेत घेतला पाहिजे. आम्ही संसदेच्या काही सदस्यांबरोबर संवाद साधत आहोत. जर गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ही बाब आपण देशाच्या आणि अन्य राज्याच्या घटकांना पटवून दिली पाहिजे," असं शरद पवार यांनी म्हटलं.