Join us  

सावलीसारखे कार्यकर्ते सोडून गेलेलं कळलं नाही, पण...; अजित पवार गटाचा आव्हाडांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 3:26 PM

जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लक्ष्य केलं होतं.

Jitendra Awhad Vs Ajit Pawar Faction ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि आरएसएस नेत्यांमध्ये झालेल्या कथित बैठकीचा दावा करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचं या बैठकीत निश्चित झाल्याचं आव्हाड यांनी म्हटलं. ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत, त्यांना सोबत घेऊन लढण्यास भाजप इच्छुक नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावत अमोल मिटकरींनी म्हटलं आहे की, "सावलीसारखे सोबत असलेले कार्यकर्ते सोडून गेले हे त्यांना कळलं नाही, पण संघ आणि भाजपच्या बैठकीत काय घडलं हे त्यांना समजलं. हल्ली इतक्या अंतर्गत गोटात शिरले आहेत, याचं कौतुक वाटतं," असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही जितेंद्र आव्हाड यांचा समाचार घेतला जातो का, हे पाहावं लागेल.

काय आहे आव्हाड यांचा दावा? 

भाजप महाराष्ट्रात आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, "नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असं ठरवण्यात आलं. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असं भाजप-आरएसएसच्या बैठकीत ठरवण्यात आलं.  ज्यांना राजकारण समजतं; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजलं असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही," असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडअमोल मिटकरीराष्ट्रवादी काँग्रेस