Join us  

निलेश लंकेंवर अजित पवार गटातून बोचरा वार; निधीचा उल्लेख करत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:29 PM

राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आमदार लंकेंवर निशाणा साधला आहे.

Nilesh Lanke ( Marathi News ) :  राष्ट्रवादीचे पारनेरमधील आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील कार्यालयात भेट घेतली. यावेळी निलेश लंके लिखित एका पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र आपण शरद पवारांच्या नेतृत्वाखालील काम करणार असल्याचं आमदार लंके यांनी सांगितलं आणि आज त्यांनी पक्षप्रवेश करणं टाळलं आहे. तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यामुळे लंके यांनी पक्षांतर करण्याचं टाळल्याचं बोललं जात आहे. मात्र निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या जवळ गेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आमदार लंकेंवर निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "अखेर गेल्या आठ महिन्यात पारनेर विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी ६३७  कोटी रुपये निधी व मविआ सरकारच्या काळात अंदाजे १०००  कोटी रुपये अजितदादांकडून घेऊन गेलेल्या निलेश लंके साहेबांचा तुतारी गटाने करेक्ट कार्यक्रम केला. दिल्या घरी सुखी राहा," असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

दरम्यान, निलेश लंके यांनी वेगळा विचार करत पक्ष सोडल्यास त्यांची आमदारकी जाईल, असा इशारा अजित पवारांनी दिला होता.

निलेश लंके आज काय म्हणाले?

आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना निलेश लंके म्हणाले की, "मी पवार साहेबांच्याच विचारांचा आहे. मी शरद पवारांचे नेतृत्व कधीच सोडलेले नाही. खासदारकीच्या निवडणुकीबाबत शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मी पुस्तक प्रकाशनासाठी इथे आलेलो आहे. मी लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी लहान कार्यकर्ता आहे," असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, तुम्ही भविष्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरही दिसणार का, असा प्रश्नही निलेश लंके यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर "साहेबांच्या विचारधारेला सोडून जाणं एवढ सोपे नाही," असं म्हणत लंके यांनी भविष्यात शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे सध्या निलेश लंके यांनी पक्षांतर करणं टाळलं आहे का, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :अजित पवारअमोल मिटकरीराष्ट्रवादी काँग्रेसपारनेर