Join us  

'त्यांना' शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही, मुख्यमंत्री कोणाचा होणार याचीच काळजी- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 7:02 PM

राज्यातल्या शेतकऱ्यांवर ओढावलेल्या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

मुंबई- राज्यातल्या शेतकऱ्यांवर ओढावलेल्या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका केली. तसेच सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणंघेणं नाही, मुख्यमंत्री कोणाचा होणार याचीच काळजी असल्याचं म्हणत त्यांनी सेना-भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला.पुढे ते म्हणाले, शेतीच्या प्रश्नाबाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. सांगली, कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचलेली नाही. ओल्या दुष्काळाची माहिती राज्यपालांना दिली असून, वीजबिल आणि कर्जमाफीची राज्यपालांकडे मागणी केल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे. खरिपाचं पिकंही वाया गेलं आहे. तातडीनं हेक्टरी 1 लाखांची मदत द्या. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सरकारचं अपयश असून, आम्हाला राजकारण करायचं नाही. क्यार आणि महा चक्रीवादळामुळे मच्छीमारांचं अतोनात नुकसान झालेलं आहे.मच्छीमारांना चक्रीवादळामुळे समुद्रात जाण्यापासून मज्जाव केला असून, समुद्रात असलेल्या मच्छीमारांना बाहेर येण्यास सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रकारची नैसर्गिक परिस्थिती महाराष्ट्रात कधीही आलेली नव्हती. महाराष्ट्रात अतिवृष्टीचं भयंकर संकट आलेलं असतानाच सरकार कधी स्थापन होणार हे अद्याप समजू शकत नसल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही राज्यावर मोठं संकट ओढावल्याचं म्हटलं आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्याच्या पाठीशी उभं राहणे गरजेचं आहे. पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवल्याचा अनुभव आहे, पेरणी वाया गेल्याने बियाणे आणि खतं शेतकऱ्यांनी पुरवावी, अशी मागणीही बाळासाहेब थोरातांनी केली आहे.  

टॅग्स :अजित पवारबाळासाहेब थोरातराष्ट्रवादी काँग्रेसशेतकरी