Join us

कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण; ‘नमामि गोदावरी'वरही काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 07:20 IST

१४६ कोटी १० लाख रुपयांची कामे घेतली हाती

मुंबई :नाशिकमध्ये २०२७ साली होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे सुव्यवस्थित आयोजन व्हावे यादृष्टीने विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अर्थसंकल्पात केली. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने 'नमामि गोदावरी' या अभियानाचा आराखडादेखील तयार करण्यात येत आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी यासंदर्भात बोलताना दिली आहे.

१४६ कोटी १० लाख रुपयांची कामे घेतली हाती

नाशिक येथे रामकाल पथविकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी १४६ कोटी १० लाख रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येत आहेत. 'दुर्गम ते सुगम' या कार्यक्रमाच्या माध्यमातून डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरे, धार्मिक स्थळे, गडकिल्ले आणि इतर निसर्गरम्य ४५ ठिकाणे रोप-वेद्वारे जोडण्यात येणार आहेत, अशी माहितीही पवार यांनी दिली.

नार-पार, दमणगंगा- एकदरे प्रकल्पाला चालनानार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ७ हजार ५०० कोटी आहे. 

दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे ३.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील ९ हजार ७६६ हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत २ हजार ३०० कोटी आहे.

 सरकारने तापी महापुनर्भरण हा १९ हजार ३०० कोटींचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल. गोदावरी खोरे पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीड हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या साहाय्याने राबवण्यात येतील. याची एकूण किंमत ३७ हजार ६६८ कोटी रुपये आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2025नाशिककुंभ मेळा