Ajit Nawale condemns repression on the Prahaar's farmers' march | प्रहारच्या शेतकरी मोर्चावर झालेल्या दडपशाहीचा अजित नवलेंकडून निषेध
प्रहारच्या शेतकरी मोर्चावर झालेल्या दडपशाहीचा अजित नवलेंकडून निषेध

मुंबई - राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा या मागणीसाठी आ. बच्चू कडू यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चावर दडपशाही करण्यात आली. किसान सभा या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे.

शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी विविध पक्षांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केवळ फोटो शेषन करत आहेत. पर्यटनाला यावं अशा थाटात दौरे करत आहेत. मुंबईला परतल्यानंतर मात्र शेतकऱ्यांचे हाल विसरून सत्तेचा सारीपाट मांडण्यात मश्गुल होत आहेत. सत्तेच्या राजकारणात शेतकऱ्यांना मदत करण्याचे विसरून जात आहेत. राजकीय नेत्यांच्या या संतापजनक दिखाऊपणाचाही किसान सभा निषेध व्यक्त करत आहे.

महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला न्यावे. केंद्रीय आपत्ती मदत निधीतून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी याद्वारे केंद्र सरकारवर दबाव आणावा अशी मागणी किसान सभा करत आहे.

राज्यातील सत्तास्थापणेचा गोंधळ अद्यापही मिटलेला नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या भीषण आपत्तीची जाणीव राखत हा गोंधळ तातडीने मिटवावा व राज्य सरकरनेही शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहचवावी अशी मागणी किसान सभा करत आहे. 

पीक विमा योजने अंतर्गत केलेले पीक कंपनीचे प्रयोग आपत्ती येण्यापूर्वी करण्यात आले आहेत. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे प्रतिबिंब त्या कापणी प्रयोगांमध्ये उमटलेले नाही. अशा पार्श्वभूमीवर जुने पीक कापणी प्रयोग रद्द करून नव्या पंचनाम्यांच्या आधारे विमा भरपाई द्या अशी मागणी किसान सभा करत आहे.

किसान सभेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची कालच मुंबईत या पार्श्वभूमीवर बैठक झाली. आपल्या या मागण्यांसाठी पुढील सात दिवसात तहसील कार्यालयांवर आंदोलने करून रस्त्यावर उतरण्याची हाक या बैठकीत किसान सभेने दिली आहे. मदत जाहीर करण्यात आणखी दिरंगाई झाल्यास सर्व शेतकरी संघटनांना सोबत घेत राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल असा इशारा किसान सभेने दिला आहे.
 

Web Title: Ajit Nawale condemns repression on the Prahaar's farmers' march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.