विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 05:59 IST2025-12-05T05:58:32+5:302025-12-05T05:59:26+5:30
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे ३८० उड्डाणे रद्द करण्यात आली. पुढील २-३ दिवस कायम राहणार असून इंडिगोकडून ८ डिसेंबरपासून उड्डाणेही कमी करण्यात येणार आहेत.

विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
मुंबई : विमानसेवेत देशातील सर्वांत मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इंडिगो’ची सेवा गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कोलमडली. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे ३८० उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक उड्डाणे विलंबाने झाली. यामुळे हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. हा गोंधळ पुढील २-३ दिवस कायम राहणार असून इंडिगोकडून ८ डिसेंबरपासून उड्डाणेही कमी करण्यात येणार आहेत.
दिल्लीमध्ये ९५, मुंबईत ८५, हैदराबाद ७० आणि बंगळुरूमध्ये ५० उड्डाणे रद्द करण्यात आली. देशातील इतर विमानतळांवरही हीच स्थिती होती. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या सहा प्रमुख विमानतळांच्या एकत्रित आकडेवारीनुसार बुधवारी एअरलाइनचा नियोजित वेळेनुसार उड्डाणे कार्यरत ठेवण्याचा दर १९.७ टक्क्यांपर्यंत घसरला. २ डिसेंबर रोजी हा दर ३५ टक्क्यांहून अधिक होता.
‘डीजीसीए’कडून गंभीर दखल
गेल्या दोन दिवसांतच नव्हे तर नोव्हेंबर महिन्यात इंडिगो कंपनीची एकूण १,२३२ विमाने रद्द झाली. या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
त्यावर कंपनीने बुधवारी खुलासा केला की, त्यांच्या ऑपरेशनल समस्या तांत्रिक बिघाड, हिवाळ्यातील उड्डाण वेळापत्रकात बदल, प्रतिकूल हवामान, गर्दी आणि नवीन रोस्टरिंग नियम यामुळे निर्माण झाली आहे.
पुणे विमानतळावर अधिक गोंधळ
पुणे विमानतळावर १० विमाने उभे राहण्याची सोय आहे. मात्र, १० पैकी ९ ठिकाणी केवळ इंडिगोचीच विमाने उभी असल्यामुळे या विमानतळावरून सेवा देणाऱ्या अन्य विमान कंपन्यांना त्याचा फटका बसला आहे.
पायलट संघटनेचा आरोप; इंडिगोचे मौन
एफडीटीएलवर उपाय म्हणून नवीन भरती करण्यासह इतर उपाययोजनांसाठी इंडिगोकडे खूप वेळ होता. परंतु, दुर्लक्ष झाल्याचा आरोप पायलट संघटनांनी केला आहे. जोपर्यंत पुरेशा क्रू मेंबर्सची हमी दिली जात नाही तोवर या एअरलाइन्सला उड्डाणांची परवानगी देऊ नये, असे या संघटनांनी म्हटले आहे. यावर इंडिगोने मौन बाळगले आहे.
इंडिगोला नव्या नियमांपासून सूट
या एकूण गोंधळानंतर डीजीसीए आणि नागरी उड्डाण मंत्रालयाची बुधवारी इंडिगोसोबत बैठक झाली त्यानुसार इंडिगोला १० फेब्रुवारीपर्यंत पायलट विश्रांती आणि ड्यूटी नियमांपासून तात्पुरती सूट देण्यात आली आहे.
नव्या नियमाचा फटका
नागरी उड्डाण क्षेत्रातील सूत्रांनुसार, डीजीसीएच्या नव्या फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशनमुळे (एफडीटीएल) ही समस्या निर्माण झाली आहे.
जानेवारी २०२४ मध्ये हा नियम लागू झाला होता. त्याची अंमलबजावणी १ जुलै आणि १ नोव्हेंबरपासून सुरू झाली. सुरक्षित विमान सेवेसाठी पायलट आणि क्रू मेंबर्सना पुरेशी विश्रांती मिळावी असा हा नियम आहे.
याच्या परिणामी नवीन भरती न करता कमी पायलटच्या सेवेतून सेवा चालवणाऱ्या या कंपनीवर परिणाम झाला आहे.