कोस्टल रोडच्या दोन मोठ्या बोगद्यांमध्ये हवा खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 01:53 AM2021-04-06T01:53:47+5:302021-04-06T01:54:13+5:30

बसणार सकार्डो नोझल यंत्रणा; देशातील हे ठरणार पहिले ठिकाण

The air will play in two large tunnels on Coastal Road | कोस्टल रोडच्या दोन मोठ्या बोगद्यांमध्ये हवा खेळणार

कोस्टल रोडच्या दोन मोठ्या बोगद्यांमध्ये हवा खेळणार

Next

मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडसाठी प्रत्येकी २.०७ किलोमीटर लांबीचे दोन महाबोगदे असतील. या महाबोगद्यांमधील हवा खेळती राहावी, यासाठी या दोन्ही बोगद्यांमध्ये ‘सकार्डो नोझल’ ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येईल. रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये देशात पहिल्यांदाच ही यंत्रणा बसविली जाईल.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे १०.५८ किलोमीटरचा कोस्टल रोड तयार केला जात आहे. या प्रकल्पासाठी ११ जानेवारीपासून बोगदे खणण्यास सुरुवात झाली. प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत या बोगद्याचे काम केले जाईल. हे बोगदे ‘मलबार हिल’च्या खालून जाणार आहेत. या बोगद्यामध्ये बसवण्यात येणाऱ्या सकार्डो नोझल या यंत्रणेत प्रत्येकी दोन मीटर व्यासाच्या वैशिष्ट्यपूर्ण पंख्यांचा समावेश आहे.

गाड्यांमधून निघणारा धूर सहा पंखे हटवणार
प्रत्येक दोन बोगद्यांसाठी तीन यानुसार दोन्ही बोगद्यांसाठी एकूण सहा पंखे असतील. यासाठी बोगद्यांच्या आतमध्ये तसेच बोगद्यांवर वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम करुन तिथे ‘सकार्डो नोझ’ यंत्रणा बसविण्यात येईल. या यंत्रणेचा उपयोग प्रामुख्याने बोगद्यांमधील हवा खेळती राहण्यासाठी होईल. तसेच बोगद्यांमधून जात असलेल्या वाहनातून बाहेर पडणारा धूर बोगद्याच्या बाहेर ढकलण्यासही या यंत्रणेची मदत होईल, अशी माहिती या प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली.

अशी आहे सकार्डो नोझल यंत्रणा
‘सकार्डो नोझल’ या यंत्रणेअंतर्गत दोन्ही बोगद्यांच्या मुखांजवळ पंख्यांशी जोडलेली वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा बसविली जाईल. तर या यंत्रणेमध्ये पंखे असलेला भाग बोगद्यांवर एक इमारत बांधून त्यामध्ये बसविण्यात येईल. यामध्ये असणारे पंखे हे प्रति मिनिट १८०० ‘राऊंड’ या उच्च वेगाने गोल फिरणारे असतील. एकावेळी एका बोगद्यातील दोन पंखे सुरू राहतील. या यंत्रणेचे आयुर्मान ५० वर्ष असून, त्यावर आगीचा परिणाम होणार नाही. तसेच या यंत्रणेद्वारे बोगद्याची वाहतूक ज्या दिशेने जात असेल, त्याच दिशेने हवा खेळती राहील.

Web Title: The air will play in two large tunnels on Coastal Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.