महागाईच्या रनवेवर विमान प्रवास; गो-फर्स्टच्या दिवाळखोरीमुळे तिकीट दर वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 06:52 AM2023-05-04T06:52:26+5:302023-05-04T06:52:59+5:30

गो-फर्स्ट आणि स्पाइस जेट या दोन्ही कंपन्यांची मिळून जवळपास ६० विमाने सध्या जमिनीवर आहेत

Air travel on an inflationary runway; Bankruptcy of Go-First will increase ticket prices | महागाईच्या रनवेवर विमान प्रवास; गो-फर्स्टच्या दिवाळखोरीमुळे तिकीट दर वाढणार

महागाईच्या रनवेवर विमान प्रवास; गो-फर्स्टच्या दिवाळखोरीमुळे तिकीट दर वाढणार

googlenewsNext

मनोज गडनीस

मुंबई - देशातील चौथ्या क्रमांकाची विमान कंपनी... मार्केट शेअर आठ टक्क्यांच्या आसपास... अशी भक्कम परिस्थिती असतानाही गो-फर्स्ट या विमान कंपनीने मान टाकल्यामुळे भारतीय हवाई क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गो-फर्स्टने दिवाळखोरी जाहीर केल्याने या कंपनीचे प्रवासी इतरांकडे वळण्याची शक्यता असल्याने साहजिकच विमान प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. किमान वर्षभर तरी ही परिस्थिती राहील असा अंदाज आहे. 

प्रवास किती महागणार?
गो-फर्स्ट आणि स्पाइस जेट या दोन्ही कंपन्यांची मिळून जवळपास ६० विमाने सध्या जमिनीवर आहेत. त्यातच देशातील विमानतळांनी पार्किंग शुल्क आणि ग्राऊंड हँडलिंग शुल्कही ३० टक्क्यांनी वाढवले आहे. याचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या खर्चावर झाला आहे. 
परिणामी हा खर्च वसूल करण्यासाठी विमान कंपन्यांनी आपल्या विविध मार्गांवरील प्रवास दरात किमान २२ टक्के ते कमाल ४४ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. आता जर गो-फर्स्टची सगळीच म्हणजे ६० विमाने थंडावली तर या किमती आणखी वाढतील.  

सद्य:स्थितीत किती विमाने उपलब्ध?

सध्या देशात विविध कंपन्यांची मिळून एकूण ७०० विमाने आहेत. मात्र, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता ही संख्या अपुरी आहे. एअर इंडिया कंपनीने नुकतीच ४७० तर इंडिगोने ५०० विमानांची ऑर्डर दिली आहे. अकासा एअरलाइन्सच्या ७२ विमानांच्या ऑर्डरपैकी १६ विमाने त्यांना मिळाली आहेत. गो-फर्स्टनेही ७२ विमानांची ऑर्डर दिली होती. मात्र, हा व्यवहार गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. अशी सुमारे ९८६ विमाने येत्या तीन ते पाच वर्षांत विमान कंपन्यांच्या ताफ्यात दाखल होतील.

कोणता प्रवास ? 
गो-फर्स्ट कंपनी प्रामुख्याने मुंबई ते दिल्ली, बंगळुरू, श्रीनगर, लेह, गोवा या मार्गावर मोठ्या प्रमाणावर फेऱ्या करते. हे मार्ग देशातील प्रमुख मार्ग आहेत. तेथे उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या कमी होणार असल्याने या मार्गावरील प्रवास प्रामुख्याने महागण्याची चिन्हे आहेत.

 

Web Title: Air travel on an inflationary runway; Bankruptcy of Go-First will increase ticket prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान