एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 05:50 IST2025-12-10T05:50:21+5:302025-12-10T05:50:54+5:30
स्पाइसजेटकडे २, तर अन्य कंपन्यांकडे उर्वरित ए-३२० विमाने आहेत. इंडिगो, एअर इंडिया, अकासा या देशातील तीन प्रमुख कंपन्यांनी जवळपास १२०० विमानांची ऑर्डर आतापर्यंत दिली आहे.

एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल
मनोज गडनीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे इंडिगो कंपनीचा घोळ सुरू असतानाच आता दुसरीकडे एअर इंडिया कंपनीने आपल्या ताफ्यातील ए-३२० जातीच्या वैमानिकांसाठी तातडीने भरती करण्याची घोषणा केल्यानंतर आगामी काळात देशातील विमान कंपन्यांच्या घोळात आणखी वाढ होण्याची शक्यता हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आजच्या घडीला देशात ए-३२० जातीची ५४० विमाने आहेत. इंडिगोच्या ताफ्यात ४०० विमाने असून, त्यापैकी ए-३२० जातीची ३७० विमाने आहेत. एअर इंडिया समूहाकडे १४४ ए-३२० विमाने आहेत.
स्पाइसजेटकडे २, तर अन्य कंपन्यांकडे उर्वरित ए-३२० विमाने आहेत. इंडिगो, एअर इंडिया, अकासा या देशातील तीन प्रमुख कंपन्यांनी जवळपास १२०० विमानांची ऑर्डर आतापर्यंत दिली आहे. ही विमाने येत्या सात ते आठ वर्षांत टप्प्याटप्याने त्यांच्या ताफ्यात दाखल होतील. मात्र, सध्या इंडिगोची अडचण लक्षात घेत एअर इंडियाने धोरणात्मक विचार करून ए-३२० जातीच्या विमानांचा परवाना असलेल्या आणि १०० तासांपेक्षा जास्त उड्डाण केल्याचा अनुभव असलेल्या वैमानिकांना पायघड्या घातल्या आहेत, तसेच, वयोमर्यादा ६२ पर्यंत ठेवली आहे. ज्या वैमानिकांना एअर इंडियामध्ये रुजू होण्यात रस आहे त्यांनी २२ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा असे सांगण्यात आले आहे. यामुळे आता विमान वाहतूक क्षेत्रात आगामी काळात वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल आणि याचा परिणाम आगामी काळात देशातील विमान सेवेत आणखी गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंडिगो-एअर इंडिया यांच्यातील संघर्ष तीव्र?
सध्या इंडिगोचा जो गोंधळ सुरू आहे, तो लवकरात लवकर निस्तरायचा असेल तर कंपनीला तातडीने किमान ३०० वैमानिकांची गरज आहे.
त्या पार्श्वभूमीवर कंपनीने येत्या १० फेब्रुवारीपर्यंत १५८ नव्या वैमानिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, डिसेंबर २०२६ पर्यंत आणखी ७४२ वैमानिकांची भरती करणार आहे.
मात्र, आता एअर इंडियाने ए-३२० जातीच्या विमानांच्या वैमानिकांना पायघड्या घातल्यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र होईल.
इंडिगोला दणका; फेऱ्यांत १०% कपात
नवी दिल्ली/मुंबई : प्रवाशांची सातत्याने ये-जा असलेल्या हवाई मार्गांवर यंदाच्या नियोजित विमान फेऱ्यांमध्ये १० टक्क्यांनी कपात करण्याचा आदेश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी दिला आहे.
इंडिगोचा गोंधळ हा जाणीवपूर्वक निर्माण केलेला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर कठोर कारवाई केली जाईल. डीजीसीएने इंडिगोला नोटिसा जारी केल्या आहेत.
राममोहन नायडू, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री
इंडिगोने मंगळवारी दिवसभरात रद्द केलेल्या फेऱ्या
दिल्ली १५०
बंगळुरू १२१
हैदाराबाद ५८
मुंबई ३१