Join us

एअर इंडिया : पाच वैमानिक व दोन तंत्रज कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 18:47 IST

एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  वैमानिकांचे फ्लाईट रोस्टर तयार करण्यासाठी उड्डाणाच्या 72 तासांपूर्वी कोविड 19 ची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे त्या तपासणीमध्ये या पाच जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.

 

 

मुंबई : एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  वैमानिकांचे फ्लाईट रोस्टर तयार करण्यासाठी उड्डाणाच्या 72 तासांपूर्वी कोविड 19 ची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे त्या तपासणीमध्ये या पाच जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. हे पाचही वैमानिक मुंबईतील असून त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. या वैमानिकांनी चीन मध्ये मालवाहू विमान नेले होते. याशिवाय एअर इंडिया इंजिनियरींग सर्व्हिस लिमिटेडचे दोन कर्मचारी देखील कोरोना ग्रस्त झाल्याचे समोर आले आहे.

लॉकडाऊन कालावधीत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद असली तरी एअर इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर मालवाहू विमानांची वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून 18 एप्रिलला दिल्ली ते चीन प्रवास करुन. बोईंग 787 द्वारे वैद्यकीय सामग्री आणण्यात आली होती. याशिवाय शांघाई, हॉंगकॉंग दरम्यान हवाई मालवाहतूक करण्यात आली होती. जगाच्या विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या विमानांची विशेष उड्डाणे केली जात आहेत. यासाठी केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांचे पालन करुन प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये अंतर्भूत असल्याप्रमाणे विशेष उड्डाणे करण्यापूर्वी व उड्डाणानंतर वैमानिकांची कोविड 19 ची तपासणी केली जाते. उड्डाणानंतर वैमानिकांना तपासणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना हॉटेलमध्ये ठेवले जाते. जर तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी सोडले जाते.  पाच दिवसानंतर त्यांची पुन्हा तपासणी केली जाते व तो अहवाल देखील नकारात्मक आला तरच त्यांना पुढील रोस्टरसाठी पात्र समजले जाते.

एअर इंडियाच्या वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना पूर्ण पीपीई सुट,  हातमोजे, मास्क व गॉगल पुरवले जातात. वैमानिक व कर्मचाऱ्यांना न्युयॉर्क, सँन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, शिकागो, लंडन,  सिंगापूर अशा शहरांमध्ये हॉटेलमध्ये वास्तव्य करताना  त्यांना जेवण, ब्रेकफास्ट व इतर सर्व सुविधा हॉटेलमध्येच मिळतील व त्यांना कोणत्याही कामासाठी हॉटेलमधून बाहेर जावे लागणार नाही याची देखील काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याएअर इंडियाभारत